नंदुरबार येथे दोन गटांत दगडफेक !

२८ जणांना अटक

नंदुरबार – अचानक दगडफेक करत एक जमाव चालून आल्यामुळे नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात ४ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजता प्रचंड तणाव निर्माण झाला. २ पोलीस कर्मचारी आणि काही तरुण या दगडफेकीत घायाळ झाले आहेत. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचल्यामुळे सर्व स्थिती नियंत्रणात आली. आतापर्यंत २८ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

१. नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात मोठ्या संख्येने जमाव अचानक चालून आला. त्याने मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने झोपेत असलेले नागरिक हादरले. जमावातील काहींनी वाहनांची तोडफोड करत ती जाळण्याचा प्रयत्न केला.

२. हा प्रकार थांबवण्यासाठी दुसरा जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यानेही दगडफेक चालू केली. यात मोठ्या प्रमाणावर विटा आणि काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला.

३. दगडांचा मारा होत असतांनाह पोलिसांनी धाडस दाखवून तो रोखण्याचा प्रयत्न केला.  यात निरीक्षक किरण खेडकर आणि  निरीक्षक रवींद्र कळमकर, तसेच अन्य दोन कर्मचारी घायाळ झाले. पहाटे ३ वाजेपर्यंत सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस दलाला यश आले.

४. या प्रकरणी २८ जणांना अटक करण्यात आली असून गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. या घटनेत दोन वाहनांची हानी झाली असून जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

५. पोलिसांनी ५ एप्रिल या दिवशी शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्याविषयी आवाहन करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

रात्री अपरात्री दगडफेक करून निर्माण केले जाणारे अराजक म्हणजे कायदा-सुव्यस्थेचा धाक नसल्याचे लक्षण !