आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उत्साही वातावरणात प्रारंभ !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु अनुराधा वाडेकर, भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, श्री. सुनील घनवट, श्री. पी.पी.एन्. नायर, ह.भ.प. गणेश महाराज

मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) – हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले. राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुलुंड येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल या दिवशी अधिवेशनाला प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

व्यासपीठावर डावीकडून पी. पी. एन. नायर, ह. भ. प. गणेश महाराज पाटील, भार्गवश्री बी. पी. सचिनवाला , श्री. सुनील घनवट

या वेळी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी पायी कोकण दिंडी’चे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदी मान्यवर वक्त्यांनी अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करून मान्यवर वक्त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वेदमंत्रपठण झाले. उपस्थित संत, मान्यवर आणि वक्ते यांचा सन्मान करण्यात आला.

हिंदुविरोधी शक्तींच्या विरोधात संघटितपणे लढावे ! – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदू जनजागृती समिति

रामनवमीच्या दिवशी देशातील अनेक राज्यांत हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. आज हिंदूंना आपल्याच देशात आपले सण-उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. भारतात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ झाले आहेत. ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनामुळे झाले.

व्यासपीठावर मार्गदर्शन करताना श्री. सुनील घनवट

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. भारतात निधर्मीवादी, जिहादी, साम्यवादी, नास्तिकतावादी आणि मिशनरी शक्तींची हिंदुविरोधी मोठी आघाडी कार्यरत आहे. या आघाडीच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटितपणे लढावे.

सर्व संघटना आणि संप्रदाय यांनी संघटितपणे कार्य करावे ! – ह.भ.प. गणेश महाराज

धर्मरक्षणासाठी अवतार जन्म घेतातच. ते मानवजातीसाठी प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी त्यांच्या अवतार काळात समाजातील विविध घटकांना एकत्रित केले अन् ते तत्कालीन दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात लढले. यातून रामायण, महाभारत काळात झालेल्या संघटनाची आवश्यकता लक्षात येते. आता तर कलियुग आहे. गेल्या काही वर्षांत हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात विविध प्रकारची आक्रमणे चालू आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा सामना करण्यासाठी सर्व संघटना आणि संप्रदाय यांनी संघटितपणे कार्य करावे.

घोषणा देताना उपस्थित हिंदू धर्माभिमानी

‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे या उद्देशाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.

उपस्थित संत, मान्यवर आणि संघटना

छायाचित्राच्या डावीकडून पी. पी. एन. नायर, अधिवक्ता खुश खंडेलवाल, श्री. सतीश कोचरेकर , श्री. सुनील घनवट , डॉक्टर अमित धडानी, श्री. मोतीलाल जैन (चर्चासत्र : मंदिरांचे व्यवस्थापन )

अधिवेशनाला सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘केरळीय परिपालन समिती’चे आचार्य श्री. पी.पी.एन्. नायर, सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम आदी मान्यवरांसह इस्कॉन, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु महासभा, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदु टास्क फोर्स, गड-किल्ले संवर्धन समिती, अहिंसा संघ, नेपाळी विश्वकर्मा समाज, श्री परशुराम तपोवन आश्रम, अखिल भारतीय मराठा महासंघ गड किल्ले समिती, सत्यध्यान विद्यापीठ, सहारा ग्रुप, पार्कसाईट गणेश पंचायतन मंदिर, सिर्वी विकास मंडळ, शिवजात मंडळ, वारकरी संपद्राय, योग वेदांत समिती, हिंदी भाषिक जनता परिषद, शिवज्योत संघटना, श्वेतांबर जैन समाज, कोकण प्रांत दिंडी, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांचे शेकडो प्रतिनिधी, तसेच अधिवक्ते, डॉक्टर, मंदिर विश्वस्त, विचारवंत, पत्रकार अधिवेशनात सहभागी झाले आहेत.