पिंपरी (जिल्हा पुणे) – स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विविध कामकाजासाठी महापालिकेच्या इमारती भाडेतत्त्वावर देण्याविषयीची मागणी केली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत.
१५ ऑगस्ट २०१८ पासून अद्यापपर्यंत या इमारतींच्या भाड्यापोटी महापालिकेला ५ कोटी ६२ लाख रुपये येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे. या थकबाकीची पूर्तता होण्याची महापालिकेला प्रतीक्षा आहे.
पुणे शहर आणि ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे मिळून नव्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून नवीन आयुक्तालयाचे कामकाज चालू झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी देण्यात आली. १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलीस आयुक्तालयाचे कामकाज चालू झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिका, भूमी आणि जिंदगी विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले की, या थकबाकीसंदर्भात पोलीस विभागाशी संपर्क साधला आहे. अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेकडून पोलिसांचा बंदोबस्त घेतला जातो. त्यापोटी पोलिसांना पैसे दिले जातात. त्यातून थकबाकीची रक्कम वर्ग करून घेऊ का ? अशी विचारणा पोलिसांना केली आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन थकबाकीची पूर्तता होईल.
संपादकीय भूमिका
|