मुंबई – उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्च न्यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. त्याची मुदत २७ मार्च या दिवशी संपणार होती.
शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायम झाल्यानंतर ठाकरे गटाला नवीन चिन्ह घ्यावे लागणार होते. समता पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असती, तर ठाकरे गटाला परत दुसरे चिन्ह शोधावे लागले असते.