इम्रान खान यांची हत्या होईल किंवा आमची !

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचे स्फोटक विधान

पाकिस्तानचे पूर्व-पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह

इस्लामाबाद – पाकिस्तानातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांना उघडपणे धमक्या देत आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ (‘पीटीआय’) हा पक्ष हे आपले (सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग) सर्वांत मोठे शत्रू आहेत. ‘इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणाला अशा वळणावर नेऊन ठेवले आहे, जिथे एकतर त्यांची हत्या होईल किंवा आमची’, असे स्फोटक वक्तव्य केले आहे. ‘पाकिस्तान मुस्लिम लीगचे संपूर्ण अस्तित्व धोक्यात आले आहे आणि त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही इम्रान खान यांच्या विरोधात कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो. त्यांनी राजकारणाचे शत्रुत्वात रूपांतर केले आहे. खान आता आमचे शत्रू आहेत आणि त्यांच्यासोबत तसाच व्यवहार केला जाईल’, असे राणा म्हणाले.

सनाउल्लाह यांच्या विधानावर ‘पीटीआय’च्या तीव्र प्रतिक्रिया

गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतांना  ‘पीटीआय’चे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी, ‘सरकारकडून इम्रान खान यांच्या जिवाला धोका आहे. याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी’, असे म्हटले आहे.