ब्रिटन सरकार सुरक्षेचे दायित्व पार पाडण्यास अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केल्याचे प्रकरण !

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

बेंगळुरू – लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड आणि तिरंगा उतरवल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सुरक्षेतील त्रुटींसाठी ब्रिटिश सरकारला उत्तरदायी धरले. ते म्हणाले, ‘‘ब्रिटन सरकार सुरक्षेचे दायित्व पार पाडण्यास पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. ज्या देशात दूतावास किंवा उच्चायुक्तालय आहे, तिथे काम करणार्‍या मुत्सद्दींना सुरक्षा पुरवण्याचे दायित्व त्या देशाचे असते. उच्चायुक्तालयाच्या भोवतालच्या आवाराच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे; पण ब्रिटिश सरकार तसे करण्यात अपयशी ठरले आहे.’’ बेंगळुरू येथे युवा संवादाला संबोधित करतांना परराष्ट्रमंत्र्यांनी हे विधान केले.

ते पुढे म्हणाले की, ज्या दिवशी खलिस्तानवादी उच्चायुक्तालयासमोर आले, त्या वेळी उच्चायुक्तालयाला पुरवण्यात आलेली सुरक्षा अपेक्षित दर्जाची नव्हती. अनेक देश उच्चायुक्तालयांना सुरक्षा पुरवण्यात निष्काळजीपणा दाखवतात. ते स्वतःच्या सुरक्षेविषयी सतर्क असतात; मात्र इतरांच्या सुरक्षेविषयी त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो. सुरक्षेविषयी अशा प्रकारचा दुजाभाव आम्ही स्वीकारणार नाही.

संपादकीय भूमिका

भारताने ब्रिटनला या प्रकरणात सुनावण्यासह त्याला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !