भविष्यात जगात भेडसवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !

  • संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

  • गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेज यांनी जगातील पाण्याच्या स्थितीविषयी प्रसारित केलेल्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत पाणीसंकटामुळे सर्वांत भीषण परिणाम होणार्‍या देशांच्या सूचीमध्ये भारतही अंतर्भूत असेल. आगामी दशकांत हिमनद्या आणि बर्फ वितळल्यामुळे भारतासाठी जीवनरेखा मानल्या जाणार्‍या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट होणार आहे. अशियातील १० प्रमुख नद्यांचा उगम हा हिमालयातून होतो. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाल्यास त्याचा फटका भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांना बसणार आहे. हिमनद्या वेगाने वितळल्यास भारतासह पाकिस्तान आणि चीनमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

१. जगातील २-३ अब्ज लोकांना वर्षातून एकदा १ मास तरी पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत जगातील निम्मी शहरी लोकसंख्येला, म्हणजे अनुमाने १.७ अब्ज ते २.४ अब्ज लोकांना जलसंकटाचा सामना करावा लागेल.

२. २ सहस्र ५०० किमी लांब असणार्‍या गंगा नदीवर विविध राज्यांतील अनुमाने ४० कोटी लोक अवलंबून आहेत. या नदीचे पाणी आटल्यास त्याचा फटका अनेक राज्यांतील लोकांना बसणार आहे.