विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ, २ वेळा कामकाज स्थगित !

राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – काही मासांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती’, या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ २३ मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी गदारोळ केला. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला असल्याने त्यांनी क्षमा मागावी, अशी मागणी सत्ताधार्‍यांनी लावून धरली. याला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदारांनी विरोध दर्शवला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा स्थगित केले.

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत सावरकरांच्या अवमानाचा विषय उपस्थित केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या वेळी गदारोळ रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी पक्षांचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन स्वतःच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर नार्वेकर यांनी १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले. कामकाजाला प्रारंभ झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत घोषणा देऊ लागले. त्यामुळे अध्यक्षांनी पुन्हा ३० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.

काँग्रेसवाले सावरकरांचा वारंवार अवमान करतात ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

अतुल भातखळकर

या वेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, २ वर्षांची शिक्षा झालेले राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा जाणीवपूर्वक आणि वारंवार अवमान करण्यात येत आहे. विधीमंडळात सावरकरांचे तैलचित्र असतांना त्यांचा असा अवमान होणे योग्य नाही.

सावरकरांविषयी हीन प्रवृत्तीने बोलणे बंद झाले पाहिजे ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकरांच्या विरोधात हीन प्रवृत्तीने बोलणे चुकीचे असून ते प्रथम बंद केले पाहिजे. सावरकरांनी जे भोगले, ते कुणीही भोगलेले नाही. क्रांतिकारक भगतसिंह यांनी सावरकरांच्या आत्मचरित्राचे पुस्तक सर्वांना वाटले होते. त्यामुळे काँग्रेसवाले स्वतःला भगतसिंह यांच्यापेक्षाही मोठे समजतात का ? राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याविषयी मी त्याचा निषेध करतो.

निषेध करण्यासाठी योग्य आयुधांचा वापर करावा !

विधानभवनात असंसदीय कार्य घडले असेल, तर त्याची चौकशी करू. आंदोलन आणि निषेध करण्यासाठी सदस्यांनी योग्य आयुधांचा वापर करावा, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.