खलिस्तानवाद्यांचा अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासावर आक्रमणाचा पुन्हा प्रयत्न !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – खलिस्तानवाद्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोस्थित भारतीय वाणिज्य दूतावासावर आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. २२ मार्च २०२३ या दिवशी काही खलिस्तानवादी दूतावासाबाहेर जमा झाले आणि त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले. रविवारी खलिस्तानवाद्यांनी येथील भारतीय दूतावासावर आक्रमण करून तोडफोड केली होती. त्यांनी दूतावासावर खलिस्तानी झेंडे लावल्याचा प्रयत्न केला होता. तसेच दूतावासाची तोडफोड केली होती. त्यांना रोखण्यास पोलिसांना अपयश आले होते. या प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका सरकारकडे अप्रसन्नता व्यक्त केली होती.

फ्रान्सिस्कोस्थित भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा अमेरिकेने निषेध केला होता. दूतावासाबाहेर सरकारने कडक सुरक्षा दल तैनात केले आहे.

अमेरिकेतील शीख समुदायाने केला निषेध

अमेरिकेतील शीख समुदायाने भारताच्या वाणिज्य दूतावासावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा निषेध केला. ‘खलिस्तानी चळवळीचा उगीच बाऊ केला जात आहे’, असे शीख समुदायाचे नेते जसदीप सिंह यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवाद्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले नाही, तर ही समस्या उग्र रूप धारण करणार, हे भारत सरकारच्या लक्षात येईल का ?