मुंबईमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट, हस्तकांचे जाळे देहलीपर्यंत ! – संजय राठोड, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन

संजय राठोड

मुंबई, २० मार्च (वार्ता.)- मुंबईतील सैफी या नामांकित खासगी रुग्णालयातील औषधालयात बनावट ‘ओरोफर फी.सी.एम्.’ या इंजेक्शनचा (शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यासाठीचे इंजेक्शन) साठा आढळून आल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही साखळी देहलीपर्यंत पोचली आहे. या प्रकरणी १२ औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी २० मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

जानेवारी २०२३ मध्ये या नामांकित रुग्णालयात उपचारासाठी असलेले मंत्रालयातील कक्ष अधिकारी विवेक कांबळे यांचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी बनावट औषधे विक्रीच्या जीवघेण्या प्रकाराविरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर संजय राठोड यांनी सभागृहात कारवाईची माहिती दिली. या प्रकरणी या नामांकित रुग्णालयातील औषधालयाच्या पडताळणीत ७ बनावट इंजेक्शन आढळल्याची माहिती संजय राठोड यांनी सभागृहात दिली. राज्यातील सर्व औषधालयांतील साठ्याची पडताळणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून चालू करण्यात आला आहे. बनावट औषधांची विक्री आणि ऑनलाईन औषधाच्या विक्री यांविषयी केंद्रशासनाने राज्यांकडून माहिती मागवली आहे. याविषयी केंद्रशासन लवकरच नवीन धोरण घोषित करणार आहे, असे संजय राठोड यांनी सभागृहात सांगितले.