देशाची अर्थव्यवस्था पेलवणारी तृणे !

नवी देहली येथे १८ मार्च या दिवशी ‘जागतिक पौष्टिक तृणधान्य संमेलन २०२३’चे उद्घाटन झाले. २ दिवस चालणार्‍या या संमेलनात जगभरातील १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ‘युरो कप २०२२’च्या स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी पटलावर असलेल्या ‘कोका कोला’ या शीतपेयाच्या बाटल्या बाजूला सरकवल्या आणि त्याऐवजी साध्या पाण्याची मागणी केली. ‘कोका कोला’ कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केल्यामुळे ‘स्वत:च्या उत्पादनाचे विज्ञापन व्हावे’, यासाठी पत्रकार परिषदेच्या पटलावर त्यांनी त्या बाटल्या ठेवल्या होत्या. रोनाल्डो यांनी या बाटल्या बाजूला केल्याचे प्रसारमाध्यमांनी कॅमेर्‍यामध्ये टिपले आणि हा व्हिडिओ जगभर प्रसारित झाला. काही क्षणांच्या या व्हिडिओमुळे काही कालावधीतच जागतिक बाजारपेठेतील कोका कोला कंपनीचे समभाग (शेअर्स) १.६ टक्क्यांनी घसरले. कोका कोला कंपनीला ४ बिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार २९ सहस्र ९९० कोटी रुपयांची हानी झाली. यातून रोनाल्डो यांनी ‘कोल्डड्रिंक’ नाकारल्याचा सल्ला दिलाच; परंतु या घटनेतून या कंपन्यांच्या प्रचंड अर्थव्यवस्थेचे गणित मांडता येईल. अशी आर्थिक उलाढाल भारतात शीतपेये आणि फास्ट फूड यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यामुळे तृणधान्य म्हणून दुर्लक्ष करून उपयोगी नाही. या तृणधान्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळता येऊ शकतो.

भारतामध्ये २०१८ हे ‘राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करून तृणधान्याला प्रोत्साहन दिले. भारताने केलेल्या आवाहनानंतर संयुक्त राष्ट्राने २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व भारताच्या पुढाकाराने होत आहे. यापूर्वीही भारताने योगाचे महत्त्व जगापुढे मांडल्यानंतर संयुक्त राष्ट्रांकडून ‘जागतिक योगदिना’ला मान्यता देण्यात आली. सद्यःस्थितीत अगदी पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी राष्ट्रांसह जगातील बहुतांश देशांना योगाचा लाभ होत आहे. योगाचा लाभ लक्षात येताच अनेक देश याकडे आकृष्ट होत आहेत. योगाप्रमाणे पौष्टिक तृणधान्याचाही संपूर्ण जगाला लाभ होईल, हे निश्चित आहे. ‘तृणधान्य’ हे केवळ शेतीपुरते मर्यादित नाही. याचा आरोग्य, व्यापार, अर्थकारण आणि देशाचा विकासदर यांवर दूरगामी परिणाम होतो. जे देश तृणधान्याचा अवलंब करतील त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम आणि बळकट होऊ शकेल, हे निश्चितपणे सांगता येईल. वर्ष १९६६ मध्ये भारतात तृणधान्याचे उत्पादन ३६९ लाख हेक्टर भूमीवर घेतले जात होते. सद्यःस्थितीत हे प्रमाण १४७ लाख हेक्टर इतके निम्म्याहून अधिक न्यून झाले आहे. याचा गंभीर परिणाम देशाला भोगावा लागत आहे.

MILLETS BROCHURE

तृणधान्याला नाकारल्याचा परिणाम !

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि प्रगत तंत्रज्ञान यांमुळे सद्यःस्थितीत विविध विकार अन् रोग यांवर उपचार सुलभ झाले आहेत. मागील काही वर्षांत देशातील मृत्यूदराचे प्रमाण घटले आहे. मृत्यूदर घटला असला, तरी विविध राेग आणि विकार यांचे प्रमाण मात्र झपाट्याने वाढत आहे. उत्पन्नातील अधिकांश पैसा हा विविध विकारांच्या उपचारांवर व्यय होत आहे, ही वस्तूस्थिती आहे. या विकारांचे मुख्य कारण आहार आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. ‘फास्ट फूड’ (पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ), अपेय पेय यांमुळे अपचन, लठ्ठपणा, कर्करोग, पित्त, कफ आदी रोग बळावले आहेत. गेल्या काही वर्षांत तृणधान्यापासून निर्माण होणार्‍या पौष्टिक आहाराची जागा फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी घेतली. त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे केंद्रशासनाने तृणधान्याकडे वळवलले धोरण अभिनंदनीय आणि देशहिताचे आहे.

आरोग्यदायी तृणधान्ये !

तृणधान्यांमध्ये ७ ते १२ टक्के प्रथिने, २ ते ५ टक्के स्निग्ध पदार्थ, ६५ ते ७५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि १५-२० तंतूमय पदार्थांचा समावेश असतो. यांतून शरिराला कॅल्शिअम, लोह, जस्त, पोटॅशिअम, तांबे आदी मानवी आरोग्यासाठी उपयुक्त घटक मिळतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब, शरिरातील विषारी द्रव्ये, कर्मरोग, मधुमेह, किडनी-यकृत आदींचे विकार आदी अनेक रोगांना तृणधान्ये अवरोध करतात. तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगीरा, सावा आदींचा समावेश होतो. सध्या घरोघरी बाजारातील महागड्या पॅकेट्समधील विदेशी आस्थापनांचा आहार बालकांना दिला जातो; मात्र तरीही सध्याची पिढी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असते. यापूर्वीच्या पिढीला तृणधान्याची लापशी, पेज आणि अन्य पदार्थ करून देण्यात येत होते; मात्र गेल्या काही वर्षांत विदेशी आस्थापनांच्या विज्ञापनांच्या भडिमार्‍यातून तृणधान्ये हरवून गेली आहेत. सध्या मधुमेह, लठ्ठपणा, अपचन आदी विविध विकारांवर डॉक्टर आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश करायला सांगतात. यातून तृणधान्याचे महत्त्व लक्षात येते. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांच्या जागी तृणधान्ययुक्त पदार्थांचा उपयोग केल्यास निम्म्याहून अधिक विकार हे औषधाविना बरे होतील. प्रकृती सुदृढ असेल, तर उपचारांवर होणारा व्यय वाचेल, तसेच मानवाच्या कार्यक्षमतेवरही त्याचा चांगला परिणाम होईल.

आरोग्यदायी तृणधान्ये !

असे असतांना गेल्या काही वर्षांत तृणधान्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. खरेतर न्यूनतम पाण्यामध्ये आणि ओबडधोबड भूमीमध्येही अल्प श्रमात अधिक उत्पन्न देणार्‍या या पौष्टिक पिकाचा उगमस्थान भारत देश आहे; मात्र सोने सोडून राख विकत घेतल्याप्रमाणे भारतीय फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांच्या आहारी गेले आहेत. यामुळे भारतीय विकतचे विकार ओढवून घेत आहेत. पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक हे केवळ एका मानवी शरिरावर परिणाम करणारे घटक राहिलेले नाहीत, तर यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !