खलिस्तानचा खरा शत्रू भारत नाही, तर पाकिस्तान आहे !

माजी खलिस्तानी नेते जसवंत सिंह (डावीकडे) आणि पंतप्रधान मोदी

नवी देहली – ‘वारिस दे पंजाब’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह खलिस्तानी नाही. त्याला खलिस्तानविषयी काहीच ठाऊक नाही; मात्र तो खलिस्तानच्या नावावर पुष्कळ पैसा कमावेल. पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही. जेव्हा त्याचा काहीच उपयोग रहाणार नाही, तेव्हा ती अन्य कुणाला तरी हाताशी धरील. पाकिस्तनालाही हे ठाऊक आहे की, जर खलिस्तान स्थापन झाले, तर खलिस्तानचे पुढील लक्ष्य लाहोर असणार आहे. त्यामुळे पाकिस्तान कदापि खलिस्तान बनू देणार नाही. त्यामुळे खलिस्तानचा खरा शत्रू भारत नाही, तर पाकिस्तान आहे, अशी स्पष्टोक्ती ‘दल खालसा’ या संघटनेचे संस्थापक आणि माजी खलिस्तानी नेते जसवंत सिंह ठेकेदार यांनी एका मुलाखतीत केली.

आम आदमी पक्ष अकार्यक्षम !

जसवंत सिंह यांनी पंजाबमधील आम आमदी पक्षाच्या सरकारला खलिस्तानच्या संदर्भात अकार्यक्षम असल्याचे म्हटले आहे. आपकडून खलिस्तान समर्थकांविषयी नरमाईची भूमिका घेण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केला. यामुळे खलिस्तानी चळवळ पुन्हा सक्रीय झाली आहे, असे ते म्हणाले.

खलिस्तानसाठी जनमत संग्रह एक षड्यंत्र !

जसवंत सिंह यांनी खलिस्तानसाठी जनमत संग्रह हे एक षड्यंत्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, बंदी घातलेल्या काही संघटना असे पाखंड करत आहेत. अशा प्रकारच्या जनमत संग्रहाची मागणी पंजाबकडून करण्यात आलेली नाही. एक बंदी घातलेली संघटना आयएस्आयच्या निर्देशामुळे ही मागणी करत आहे. जर भारतीय पारपत्र असणारा नागरिक, अशी मागणी करत असता, तर एकवेळ ते लक्षात आले असते; मात्र जे लोक कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आदी देशांचे नागरिक आहेत आणि ते त्यांच्या देशात मतदान करतात, त्यांना अशी मागणी करण्याचा कोणताही अधिकार नाही.

खलिस्तान्यांच्या काही मागण्या मान्य केल्यास चळवळ संपेल !

जसवंत सिंह यांनी सांगितले की, जर सरकारने खलिस्तान नेत्यांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर ही चळवळ समाप्त होईल. शीख राजकीय बंदीवानांची सुटका, कलम २५ बी २ हटवणे आदी मागण्या मान्य केल्यास ही चळवळ हळूहळू दुर्बल होत जाईल. या मागण्या मान्य केल्या, तर देशाची काहीही हानी होणार नाही.

पंतप्रधान मोदी यांनी शिखांसाठी पुष्कळ काही केले आणि करत आहेत !

जसवंत सिंह ठेकेदार पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी शिखांसाठी पुष्कळ काही केले आहे. ते शिखांचा सन्मान करतात आणि त्यांनी शिखांसाठी अनेक कामे केली आहेत आणि करत आहेत. त्यांनी कर्तारपूर कॉरिडोर (सुसज्ज मार्ग) उघडला. गुरु गोविंद सिंह यांच्या दोन मुलांच्या नावाने पुरस्कार घोषित केले.