सध्या अमेरिकन कोट्यधीश ‘जॉर्ज सोरोस’ (भारतविरोधी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करणारे व्यावसायिक) हे वादात सापडले आहेत. सोरोस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक असून मोदींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. काही दिवसांपूर्वी सोरोस यांनी ‘भारत हा लोकशाही देश आहे; परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. ते मुसलमानांविरोधात हिंसा भडकवण्याचे काम करत असून त्यामुळेच देशाची प्रगती झाली. भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल, पेट्रोल खरेदी करतो आणि त्यातून मोठा लाभांश मिळवतो’, असे म्हटले आहे.
पुढे पंतप्रधान मोदी आणि भारतीय उद्योगपती अदानी यांच्यावरही त्यांनी टीका केली. सोरोस यांचे वय ९२ इतके आहे. त्यामुळे या वयातही त्यांना ‘नरेंद्र मोदी काय करतात ?’, याची चिंता पडलेली आहे. जर्मनीमध्ये पार पडलेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. जगात शांतता आणि स्थिरता कशी आणता येईल ? यावर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली; परंतु शांतता आणि स्थिरता बाजूला राहिली अन् त्यांनी आपले अकलेचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानली. या भाषणात त्यांनी हवामान पालट, रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीयेतील भूकंप या सूत्रांना स्पर्श केला; परंतु कारण नसतांना त्यांनी मोदींना ‘हुकूमशाह’ ठरवण्याचा प्रयत्न केला. सोरोस यांच्यामागे मोठी ‘इकोसिस्टीम’ (हिंदुद्वेषी लोकांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवण्यासाठी केलेली कार्यप्रणाली) आहे की, जी मोदीच नव्हे, तर भारताचाही तिरस्कार करते.
१. जॉर्ज सोरोस नेमके आहेत तरी कोण ?
हंगेरीत जन्मलेले जॉर्ज सोरोस वर्ष १९५६ मध्ये अमेरिकेत आले. कोट्यधीश असलेले सोरोस स्वतःला समाजसेवक असल्याचे सांगतात. वर्ष २०११ पर्यंत ते मोठमोठ्या लोकांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन पहात होते. यातूनच त्यांनी ८.५ बिलियन डॉलर म्हणजेच ७० सहस्र कोटी रुपयांची संपत्ती उभी केली. त्यांनी वर्ष १९८४ मध्ये ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ची स्थापना केली. याद्वारे १२० देशांमधील अभिव्यक्तीस्वातंत्र्य, न्याय-समानता, सरकारचे कर्तव्य यांवर काम करणार्या संस्थांना सहकार्य केले जाते. सोरोस यांना पैशांची कमी नाही. वर्ष १९९९ मध्ये त्यांनी भारतात त्यांच्या फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यास प्रारंभ केला. वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत त्यांनी भारतातील विविध संस्थांना ११.९ बिलियन डॉलर म्हणजेच १०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. यातील ३३ टक्के साहाय्य ‘डेमोक्रॅटिक प्रॅक्टिस’ (लोकशाही मूल्यांसाठी) आणि ३१ टक्के ‘जस्टिस रिफॉर्म अँड रूल ऑफ लॉ’साठी (न्याय सुधारणा आणि कायदा-सुव्यवस्थेचे राज्य) यांसाठी देण्यात आले.
२. सोरोस यांनी मोदींना ‘हुकूमशाह’ म्हणण्यामागील कारण
वर्ष २०१६ मध्ये ‘विदेशी योगदान नियमन कायद्या’चे (‘एफ्.सी.आर्.ए.’चे) उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ला ‘देखरेखीच्या सूची’त (‘वॉच लिस्ट’मध्ये) टाकले, ज्याला सोसायटीने वर्ष २०२० मध्ये देहली उच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. वर्ष २०२० मध्ये ‘जागतिक इकोनॉमिक फोरम’मध्ये सोरोस यांनी मोदींना ‘हुकूमशाह’ म्हणत ‘राष्ट्रवादी विचारधारेचे लोक धोकादायक आहेत’, असे म्हटले होते. सोरोस यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी यांचे सर्व लक्ष्य निवडणुका जिंकण्यावरच आहे; परंतु मोदी यांच्यावर टीका करण्याचे ज्यांचे एकमेव लक्ष्य आहे, ते सोरोस असे ‘वायफळ’ आरोप करत आहेत. ‘राजकीय नेता कोणताही असो तो निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य ठेवतो’, हे सोरोस यांना बहुधा माहिती नसावे.
३. काँग्रेस आणि सोरोस यांच्यातील संबंधाची शक्यता
‘हिंडेनबर्ग’, ‘बीबीसी माहितीपट’ यांवरून काँग्रेस आक्रमक झाली; परंतु सोरोस आणि काँग्रेसचेही फार मधुर संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण ‘भारत जोडो’ यात्रेत ‘ओपन सोसायटी’चे उपाध्यक्ष सलील शेट्टी राहुल गांधींसह पायी चालले होते. शशी थरूर तर सोरोस यांचे जवळचे मित्र आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मुलगी अमृत सिंह ‘ओपन सोसायटी जस्टीस इनिशिएटीव्ह’मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि आतंकवादविरोधी योजने’चे काम सांभाळत आहे.
४. सोरोस यांचे खरे स्वरूप !
सोरोस यांनी एका मुलाखतीत ‘पैसे कमवतांना नैतिकता आणि अनैतिकता पहात नाही’, असे म्हटले आहे. त्यामुळे सोरोस यांनी केलेली बडबड गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. वर्ष २०२२ मध्ये लोकशाहीच्या संबंधाने एक अहवाल आला, ज्यात भारताला ९३ वा क्रमांक देण्यात आला आणि भारतातील सरकार ६ वे ‘निरंकुश सरकार’ असल्याचेही यात म्हटले गेले. ‘डेमोक्रॅसी रेटिंग २०२२’, हा अहवाल ‘व्ही-डेम’ संस्थेने प्रकाशित केला होता आणि सोरोस यांची ‘ओपन सोसायटी’ ही ‘व्ही-डेम’ला आर्थिक साहाय्य करते. वर्ष २००३ मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले जॉर्ज बुश यांच्या पराभवासाठीही सोरोस यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे संपत्ती कमवायची आणि त्यातून भारतविरोधी चाली खेळायच्या, हा सोरोस यांचा जुनाच धंदा आहे की, जो ते ९२ व्या वर्षी न थकता आणि न थांबता करत आहे.
– श्री. पवन बोरस्ते
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १९.२.२०२३)