ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कर्मचार्‍यांची संपाकडे पाठ; केवळ निर्दशने !

राज्य शासनाच्या कार्यालयांचे काम मात्र ठप्प !

ठाणे, १५ मार्च (वार्ता.) – जुन्या निवृत्ती वेतन योजनेवरून महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्‍यांनी आक्रमक होऊन संपाचे हत्यार उपसले असतानांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी संपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. ठाणे महानगरपालिकेच्या कामगार संघटनेने केवळ निदर्शने केली, तर कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत मात्र साधी निदर्शनेही करण्यात आली नाहीत. यामुळे सर्वच पालिकांचा कारभार सुरळीतपणे चालू होता. असे असले तरी राज्य शासनाचे कर्मचारी मात्र संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार, आर्.टी.ओ. कार्यालयांमधील काही विभागांचे कामकाज ठप्प झाले होते.


ठाणे जिल्ह्यात १४ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह सहस्रो अन्य कर्मचार्‍यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी संप केला. कर्मचार्‍यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमून घोषणा दिल्या. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ९५ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यालयात आलेल्या अनेकांची कामे रखडली. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक आणि इतर कर्मचारी यांनीही रुग्णालयाच्या आवारात संप पुकारला होता. त्यामुळे येथील रुग्णांच्या सेवेचे दायित्व आधुनिक वैद्य आणि कंत्राटी कामगार यांच्यावर आले होते. दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने शिक्षक, प्राध्यापक यांनी हातांना काळ्या फिती बांधून शाळेत, महाविद्यालयात उपस्थित राहून संपात सहभाग नोंदवला.