पोखरापूर (जिल्हा सोलापूर) येथील जगदंबादेवीचे पुरातन मंदिर भुईसपाट !

राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्या रातोरात कारवाईने ग्रामस्थांमध्ये अप्रसन्नता !

मोहोळ (जिल्हा सोलापूर) – तालुक्यातील पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे १२ व्या शतकातील पुरातन मंदिर ४ मार्चच्या रात्री पुनर्रोपण करण्यासाठी (मंदिराच्या रचनेत पालट न करता ते अन्यत्र बांधण्यासाठी) भुईसपाट केले. मोहोळ पंढरपूर पालखी मार्गाच्या संपादित जागेत हे मंदिर येत असल्याने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पुरातत्व विभाग यांनी हे मंदिर रातोरात पाडल्याने पोखरापूर येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मंदिराच्या प्रत्येक दगडावर क्रमांक टाकून मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता; मात्र अधिकार्‍यांनी एका रात्री जेसीबीने मंदिर भुईसपाट केले. या प्रकरणी ‘आम्हाला विश्‍वासात न घेता प्राचीन मंदिराचे पाडकाम केले, तसेच मंदिराचे अवशेष जेसीबीने पाडले’, असा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक होऊन सोलापूर-पंढरपूर पालखी मार्ग काही काळ रोखून धरला होता.

वर्ष २०२२ मधील पुरातत्व विभागाचे पत्र

१. पुरातत्व विभागाने ‘हे मंदिर जतन होणे आवश्यक आहे’, अशी भूमिका घेतली होती. न्यायालयात हे प्रकरण असतांना विभागाने म्हणणे फिरवले आणि चुकीची कागदपत्रे सादर केली. (हिंदूंची धार्मिक स्थळे आणि वास्तू यांविषयीच्या समस्या अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा ! – संपादक) यानंतर न्यायालयाने मंदिर पुनर्रोपण करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार आम्ही सहकार्य करत आहोत; पण ठेकेदाराच्या यंत्राच्या साहाय्याने मंदिर पाडले. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक दगडावर क्रमांक टाकून ते अवशेष जपायला हवेत. असे असतांनाही ते मंदिर रातोरात उद्ध्वस्त केले. या सर्व प्रकारामुळे गावात अप्रसन्नता आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

२. ‘श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट’ने १० मासांपूर्वीच पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे मंदिर वर्ष १२३५ पूर्वीचे असल्याचा लेखी पुरावा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी देवस्थानच्या वतीने सातत्याने पाठपुरावा चालू होता. पोखरापूरच्या ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून देवीचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी पत्र व्यवहार करत सदरचे मंदिर सुरक्षित ठेवण्याविषयी, तसेच मंदिर पुरातन असल्याने पालखी मार्ग करतांना देवीच्या मंदिराचे प्राचीनत्व अबाधित राहील, याची दक्षता घेण्याविषयी निवेदने दिली होती.

३. वर्ष २०२२ मध्ये श्री जगदंबादेवीचे मंदिर प्राचीन वास्तूंमध्ये मोडत असल्याने त्याला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्याविषयीचे पत्र शासनाच्या पुरातत्व विभागाने मोहोळ-आळंदी पालखी मार्ग प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले होते. (मंदिर पुनर्रोपण करण्याच्या नावाखाली पाडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने ग्रामस्थ, मंदिराचे विश्‍वस्त, भाविक यांना विश्‍वासात घेणे अपेक्षित होते ! – संपादक)

मंदिराचा पुढील आराखडा बनवून अधिक सुंदर मंदिर बांधण्याचा आमचा प्रयत्न ! – डॉ. विलास वाहने, साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग पुणे

उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने शक्य त्या दगडांवर क्रमांक टाकले आहेत. २० मार्चपर्यंत मूर्ती स्थलांतर करण्याचा आदेश असल्याने मी स्वत: ४ मार्चपासून येथे उपस्थित आहे. मूर्ती भंग होऊ नये, यासाठी ‘पीयुपी लहर’ लावून साच्याच्या साहाय्याने मूर्ती काढण्याचे काम चालू आहे. सर्व ग्रामस्थांच्या समोर आम्ही मंदिराचा पुढील आराखडा ठेवून याहून अधिक सुंदर मंदिर बांधण्याचा आमचा प्रयत्न राहील.

संपादकीय भूमिका 

विकासासाठी मंदिरे पाडणारा पुरातत्व विभाग आणि प्रशासन कधी या कारणासाठी रातोरात मशिदी पाडण्याचे धाडस दाखवणार का ?