छत्रपती संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामकरण करण्यासाठीच्या उपोषणात झळकावली औरंगजेबाची भित्तीपत्रके !

खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून साखळी उपोषण !

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे यावरून दिसून येते !

संभाजीनगर – ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला; मात्र आता या निर्णयाला एम्.आय.एम्. पक्षाने विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात आणि छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबाद नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार जलील यांनी ४ मार्चपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. (हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या एम्.आय.एम्. पक्षाच्या खासदारांकडून आणखी काय अपेक्षा करणार ? – संपादक) या उपोषणात एम्.आय.एम्.चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले असून या वेळी ‘आय लव्ह औरंगाबाद’ नावाचे फलक घेऊन काहीजण या उपोषणात सहभागी झाले आहेत. ‘राजकारणासाठी शहराचे नाव पालटण्यात आले आहे’, असा आरोप जलील यांनी केला. उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, हे साखळी उपोषण कधीपर्यंत असेल ? याविषयी काही सांगता येणार नाही. उपोषणासाठी आलेले सर्वसामान्य औरंगाबादकर आहेत. ‘औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच ठेवायला हवे’, अशी त्यांची भावना आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे राजकारण करत नाही. हे माझे शहर असून त्यासमवेत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ‘आमच्या शहराचे नाव देहली आणि मुंबई येथे बसून पालटू शकत नाही’, हे आम्हाला सरकारला सांगायचे आहे. देशात लोकशाही असून तुमची हुकूमशाही चालणार नाही. त्यामुळे आम्हाला नामांतराचा निर्णय मान्य नाही. (औरंगाबादप्रमाणे मोगल आक्रमकांची नावे दिलेली सर्वच शहरे, गावे, रस्ते यांची नावे पालटावी, ही जनभावना आहे, हे जलील यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)

(सौजन्य : News18 Lokmat)

संपादकीय भूमिका

  • छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते. अशी भित्तीपत्रके झळकावल्याच्या प्रकरणी संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?
  • भारतातील शहरे, गावे यांना दिलेली मोगल आक्रमकांची नावे लवकरात लवकर पालटण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक !