माजी आमदार श्री. बाळासाहेब मुरुकुटे यांची सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती
मुंबई – सध्या गड-दुर्गांची दुरवस्था झालेली असून त्यावर अवैध घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास पालटून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल. अन्य राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने गड-दुर्गांचे संवर्धन केले जात आहे, तसे महाराष्ट्रातही झाले पाहिजे. यासाठी शासनाने गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून छत्रपती शिवरायांच्या गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे, अशी विनंती माजी आमदार श्री. बाळासाहेब मुरुकुटे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना २ मार्च या दिवशी पत्राद्वारे केली आहे.
श्री. बाळासाहेब मुरुकुटे यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. शासनाने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याची अभिनंदनीय कृती केलेली आहेच; मात्र आजही महाराष्ट्रातील किमान ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवर आणि त्यांच्या परिसरात अतिक्रमणे झालेली आहेत. त्या विरोधात तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
२. उपरोक्त मागण्यांसाठी महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. तरी शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे.