निकालांचा मतीतार्थ !

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयामध्ये ‘राष्‍ट्रवादावर आधारित विकास’ हे सूत्र रूजू शकते, हेच भाजपने दाखवून दिले !

अपेक्षेप्रमाणे मतदारांनी सलग दुसर्‍यांदा भाजपला त्रिपुरात विजयी केले आहे. नागालँडमध्‍येही भाजपने सहयोगी पक्षांना समवेत घेत राज्‍यात विजय मिळवला आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेसची कचखाऊ भूमिका आणि अल्‍पंसख्‍यांकांभोवती फिरणारे राजकारण यांमुळे गेली अनेक वर्षे ईशान्‍येतील राज्‍ये ही साम्‍यवादी आणि काँग्रेस पक्षांकडेच होती. केवळ ही राज्‍ये साम्‍यवाद्यांकडे होती, असे नाही, तर विकास आणि राष्‍ट्रवाद या सूत्रांपासूनही ती लांबच होती. गत निवडणुकीत मात्र भाजपने साम्‍यवाद्यांचा २५ वर्षांपासूनचा गड उद़्‍ध्‍वस्‍त करत ‘इथेही राष्‍ट्रवादावर आधारित विकास’ हे सूत्र रूजू शकते, हेच दाखवून दिले. यंदाही नागालँडसारख्‍या ख्रिस्‍तीबहुल राज्‍यातही भाजपने विजय मिळवला असून हा विजय राष्‍ट्रप्रेमींना सुखावणारा आहे. विकास, हिंदुत्‍व आणि राष्‍ट्रवाद हीच सूत्रे सध्‍या जनता विचारात घेत असून त्‍यानुसार चालणार्‍या पक्षांना जनता सकारात्‍मक प्रतिसाद देते, हे मागील काही निवडणुकांच्‍या निकालांवरून दिसून येत आहे.

‘शून्‍य’त्‍वाच्‍या दिशेने काँग्रेसची वाटचाल !

वर्ष १९८० च्‍या दशकात गोरक्षणासाठी रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या साधू-संतांवर गोळीबार करण्‍याचे आदेश देणारी काँग्रेस, रामसेतूच्‍या संदर्भातील याचिकेत ‘श्रीराम अस्‍तित्‍वात नव्‍हता’, असे सांगणारी काँग्रेस, अस्‍तित्‍वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ निर्माण करून हिंदु साधू-संत, कार्यकर्ते यांना कारागृहात टाकणारी काँग्रेस तिच्‍या असंख्‍य पापांमुळे आता अस्‍तित्‍वाची लढाई लढत असून अनेक राज्‍यांमध्‍ये ती ‘शून्‍य’त्‍वाच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. त्रिपुरातही काँग्रेस आणि साम्‍यवादी यांच्‍यामध्‍ये कधीच सख्‍य नव्‍हते आणि या दोघांच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये खुनी संघर्षही अनेक वेळा झाला आहे. असे असतांनाही केवळ हिंदुत्‍वाच्‍या सूत्रावर वाटचाल करणार्‍या भाजपला शह देण्‍यासाठी यंदाच्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि साम्‍यवादी एकत्र आले; मात्र या दोघांच्‍याही विचारसरणीला जनतेने परत एकदा नाकारले असून त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे काँग्रेसच्‍या जागा अल्‍प झाल्‍या आहेत. यावरून ‘अल्‍पसंख्‍यांकांचे लांगूलचालन आणि भ्रष्‍टाचार हीच विचारसरणी असलेल्‍या काँग्रेसला आता जनता नाकारत आहे’, हे स्‍पष्‍टच होत आहे.

वर्ष २०२४ मध्‍ये केंद्रात परत एकदा भाजप सरकार न येण्‍यासाठी विरोधक प्रयत्नशील असून त्‍याअगोदर होणार्‍या ९ राज्‍यांच्‍या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्‍याचा प्रयत्न आहे. त्‍यामुळे विशेषकरून जिथे ख्रिस्‍त्‍यांची मते निर्णायक ठरतात, अशा ईशान्‍येतील राज्‍यांमध्‍ये विजय मिळवण्‍यासाठी काँग्रेस आणि साम्‍यवादी धडपड करत होते. त्‍यांचे हे प्रयत्न मात्र यशस्‍वी झाले नाहीत.

ईशान्‍येतील राज्‍यांमधील समस्‍या !

वर्ष २०११ च्‍या आकडेवारीनुसार ईशान्‍येतील राज्‍यांत हिंदूंची लोकसंख्‍या केवळ ५४ टक्‍के आहे. या राज्‍यांमध्‍ये नेहमीच काँग्रेस, साम्‍यवादी पक्ष, स्‍थानिक पक्ष यांचाच वरचष्‍मा राहिला आहे. ‘या राज्‍यांमधील नागरिक देशाच्‍या मुख्‍य विचारधारेपासून, राष्‍ट्रवादाच्‍या विचारसरणीपासून कसे लांब रहातील’, हाच प्रयत्न नेहमी इथल्‍या सरकारांनी केला. मूळचे हिंदु असलेल्‍या अनेक आदिवासी लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून या राज्‍यांतील ख्रिस्‍त्‍यांची संख्‍या वाढवण्‍याचा प्रयत्न नेहमी इथल्‍या राज्‍यकर्त्‍यांनी केला. नागालँड, आसाम, मणिपूर या राज्‍यांमध्‍ये आतंकवादी, तसेच देशद्रोही संघटना कार्यरत असून शासकीय अधिकारी, व्‍यापारी, कर्मचारी यांच्‍याकडून ते उघडउघड वसुली करतात आणि पैसे न दिल्‍यास हत्‍या करण्‍यास मागे-पुढे पहात नाहीत. आसामचे तर बांगलादेशी घुसखोरीचे सूत्र अत्‍यंत गंभीरच आहे.

आतंकवादी, नक्षलवादी यांच्‍या दबावामुळे गेली अनेक वर्षे या राज्‍यांमध्‍ये हिंदी भाषेवर अघोषित बंदी होती. काही जिल्‍ह्यात ‘इंडियन गो बॅक’सारखी भित्तीपत्रके पहायला मिळतात. एकट्या मणिपूर राज्‍यात १० पेक्षा अधिक आतंकवादी संघटना सक्रीय असून त्‍यांना विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. त्रिपुरातही ‘त्रिपुरा नॅशनल लिबरेशन फ्रंट’सारखी संघटना नेहमीच त्रिपुरात अशांतता कशी राहील यासाठीच प्रयत्न करते. याच समवेत हा भाग बहुतांशकरून डोंगर, दर्‍या-खोरे अशांचा असल्‍यामुळे हा नेहमीच भारताच्‍या मुख्‍य प्रवाहापासून लांब राहिला, किंबहुना तो ठेवला गेला. ‘या राज्‍यांमध्‍ये असलेली घुसखोरी, धर्मांतर या समस्‍या काँग्रेस, साम्‍यवादी यांना ठाऊक नव्‍हत्‍या’, असे नाही, तर केवळ मतपेढीच्‍या राजकारणामुळे काँग्रेसने या क्षेत्रात कधीच विकास होऊ दिला नाही अन् नेहमीच तुष्‍टीकरण, भ्रष्‍टाचार याला प्रोत्‍साहन दिले.

भाजपसमोरील आव्‍हाने !

ईशान्‍येकडील राज्‍यांत मागील अनेक वर्षे विकास झालेला नाही. ‘आम्‍हाला देशपातळीवर सातत्‍याने डावलले जाते’, अशी भावना तेथील जनतेच्‍या मनात आहे. या लोकांच्‍या मनात ती विश्‍वासार्हता निर्माण करण्‍याचे दायित्‍व सरकारचे असेल. यापूर्वीच्‍या काळात ईशान्‍य भारतातील राज्‍ये भारतापासून तुटतात कि काय, इतकी गंभीर परिस्‍थिती होती. नागालँडला तर अप्रत्‍यक्ष ख्रिस्‍ती राज्‍य घोषित केल्‍यासारखी स्‍थिती होती. या राज्‍यांमध्‍ये चीनही हळूहळू घुसखोरी करून ‘ही राज्‍ये अशांत कशी रहातील ?’, ते पहात होता. चीनच्‍या सीमेलगत असलेल्‍या काही राज्‍यांतील गावांमध्‍ये केवळ चिनी रेडिओ ऐकू येणे, चीनने गावांना काही सुविधा देण्‍याचा प्रयत्न करणे असेही प्रकार उघडकीस आले आहेत. याच सूत्रांवर भाजपला कठोरतेने प्रयत्न करावे लागतील. हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !