झाशी (उत्तरप्रदेश) – येथे १५ नोव्हेंबरच्या रात्री येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविज्ञालय आणि शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. अर्भकांच्या अतीदक्षता विभागात ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अनुमान वर्तवला गेला आहे. या दुर्घटनेविषयी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’द्वारे शोक व्यक्त केला.
१. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात काही काळ मोठी गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्याचे पोलिसांनी सांगितले.
२. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नवजात अर्भकांच्या आई-वडिलांनी रुग्णालयाबाहेर टाहो फोडल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसत होते.
३. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकार्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
४. मे २०२४ मध्ये देहलीतील विवेक विहार परिसरातील लहान मुलांच्या रुग्णालयातही अशाच प्रकारची आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळी ६ अर्भकांचा मृत्यू झाला होता.