कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट परिसरात दीपोत्सव करण्यात आला. गेली ४५ वर्षे हा उपक्रम चालू आहे. प्रारंभी पंचगंगेची आरती करून उत्सवास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी विविध सामाजिक मंडळे, विविध संघटना आणि तरुण मंडळे यांनी वेगवेगळ्या विषयांवर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. नदीच्या परिसरातील प्राचीन मंदिरांवर सुंदर रोषणाई करण्यात आली होती. या वेळी आतषबाजीही करण्यात आली.
या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक देसाई, सर्वश्री दिगंबर फराकटे, राज कापसे, नीलेश जाधव, अक्षय मिठारी, अवधूत कोळी, प्रवीण चौगुले यांसह अन्य सहभागी झाले होते. या उपक्रमात ‘व्हाईट आर्मी’च्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.