कोल्हापूर – विधानसभेसाठी बुधवार, २० नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानापूर्वी ४८ घंटे अगोदर म्हणजे सोमवार, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करता येणार नाही अथवा सभा घेता येणार नाही. मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला मतदान संपेपर्यंत अवैधरित्या जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, ५ किंवा ५ हून अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी घोषित केले आहेत.
हा आदेश मतदानासाठी घरोघरी जाऊन भेटी देण्यासाठी लागू रहाणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.