सातारा, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – आपली कर्तव्ये आणि कर्म करतांना ती योग्य मार्गाने केली, तर आपल्याला अनुग्रह मिळतो. महाभारत आणि वेद यांनीही असे सांगितले आहे की, संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व वेदमंत्र म्हणणार्या ब्राह्मण, तसेच क्षत्रियांवर आहे; कारण ते जाणकार आहेत, असे प्रतिपादन काशी येथील प्रथम आणि महाविभूती पंडित प्रवर प.पू. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी केले. श्रीक्षेत्र सज्जनगड (सातारा) येथील ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित श्रीविष्णु पंचायतन यागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ महाराज कोटणीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प.पू. गणेश्वर शास्त्री द्रविड पुढे म्हणाले की, पशूपालनाचे काम वैशांकडे दिले आहे. शेष सेवा आणि सत्ता केंद्र पार पाडत असतांना आज संपूर्ण देशात चालू असलेले गोपालनाचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. लोक कर्तव्यचुकार झाले, तर त्यांना दंडीत करण्याचे कार्य क्षत्रियांनी करायचे आहे. असाच क्षात्रधर्म प्रभु रामचंद्रांनी आपल्याला शिकवला आहे. दंडाच्या भीतीनेच आपण आपल्या कार्यात व्यवस्थितपणा आणावा. कार्यकर्ता हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. जग हे स्वच्छंदीपणे चालणारे आहे. आपण आपले कर्म योग्य केले, तर भगवान प्रसन्न होतात.