गुरुग्राम (हरियाणा) – आज अनेक लोक संशोधन करत आहेत; पण लाल फितीमुळे ते काहीच करू शकत नाहीत. आजकाल सगळा उद्देश पोट भरणे हाच आहे. हे पाहून फार वाईट वाटते, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे ‘व्हिजन फॉर डेव्हलप्ड इंडिया २०२४’ या परिषदेचे उद्घाटनाच्या वेळी केले.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, १६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली. आज काळ विकसित भारताची मागणी करत आहे. जगातील ४ टक्के लोकसंख्येला ८० टक्के सुविधांची आवश्यकता आहे. सर्वसमावेशकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक भारतियाला स्वतःचा विकसित आणि सक्षम भारत हवा आहे. गेल्या २ सहस्र वर्षांत विकासाचे अनेक प्रयोग झाले. तंत्रज्ञान आले पाहिजे; पण क्रूरता नसावी. प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजेे. या सर्व गोष्टी समवेत घेऊन कसे चालायचे ?, हे जगाने आपल्याकडून शिकले पाहिजे. केवळ अनुकरण करण्यासारख्या गोष्टी घ्या; परंतु आंधळेपणाने अनुकरण करू नका.