मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार ! – किशोर घाटगे

कोल्‍हापूर आणि पुणे येथेही पत्रकार परिषद !

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. मधुकर नाझरे, श्री. प्रमोद सावंत, श्री. किरण दुसे आणि बोलतांना श्री. किशोर घाटगे (उजवीकडे)

कोल्‍हापूर – मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी दिली. मोर्च्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर कोल्‍हापूर येथे ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्‍या वतीने पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍या प्रसंगी त्‍यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी श्री. प्रमोद सावंत, ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्‍वामी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरेे उपस्‍थित होते.

या प्रसंगी श्री. प्रमोद सावंत म्‍हणाले, ‘‘विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांच्‍या उपस्‍थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीत ठरल्‍याप्रमाणे गडावरील सर्व अतिक्रमण निघण्‍याच्‍या दृष्‍टीनेच कृती होणे अपेक्षित आहे. याला कोणत्‍याही प्रकारचे वेगळे वळण मिळता कामा नये.’’


‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली !

पत्रकार परिषदेत उपस्‍थित डावीकडून ऋतुजा माने, श्री. रवींद्र पडवळ, पत्रकारांना संबोधित करतांना श्री. पराग गोखले, श्री. धनंजय पवार आणि अधिवक्‍ता निलेश निढाळकर

पुणे, १ मार्च (वार्ता.) – मुंबई येथे ३ मार्च या दिवशी होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ची माहिती देण्‍यासाठी पुणे येथील ‘श्रमिक पत्रकार भवन’ येथे १ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. या पत्रकार परिषदेत ‘महाराष्‍ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे पुणे समन्‍वयक श्री. पराग गोखले, समस्‍त हिंदु बांधव सामाजिक संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष रवींद्र पडवळ, गड-दुर्ग सेवा समिती, पुणेच्‍या महिला कार्यकर्ता ऋतुजा माने, हिंदवी साम्राज्‍य महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष धनंजय पवार, अधिवक्‍ता नीलेश निढाळकर यांनी पत्रकारांना संबोधित केले.

गडकोटांचा इतिहास आपण पुढच्‍या पिढीला सांगितला नाही, तर पुढच्‍या पिढीचे भविष्‍य उज्‍ज्‍वल असणार नाही ! – नीलेश निढाळकर, अधिवक्‍ता

गडकोटांमुळे स्‍वराज्‍याचे रक्षण करणे, हे सोपे होते, हे तत्त्व छत्रपती शिवरायांना ठाऊक होते. या गडकोटांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली आणि या सर्व गडकोटांना इतिहास आहे. आपण हा इतिहास आपल्‍या पुढच्‍या पिढीला सांगितला नाही, तर पुढच्‍या पिढीचे भविष्‍य उज्‍ज्‍वल असणार नाही; कारण ज्‍या देशाचा इतिहास चांगला असतो त्‍या देशाचे भविष्‍य उज्‍ज्‍वल असते. ज्‍या देशाचा इतिहास बिघडलेला असतो त्‍या देशाचा भूगोल बिघडलेला असतो. आपल्‍या देशात विशेष करून या महाराष्‍ट्रामध्‍ये गडकोटांचे संवर्धन पुरातत्‍व खात्‍याकडे आहे; पण पुरातत्‍व खाते हे दायित्‍व सक्षमपणे पार पाडत नाही. त्‍यासाठीच स्‍वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ ची आवश्‍यकता आहे.

पुरातत्‍व विभाग निष्‍क्रिय झाल्‍यामुळे गड-दुर्गांसाठी स्‍वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळ’ हवे ! – रवींद्र पडवळ, संस्‍थापक अध्‍यक्ष, समस्‍त हिंदु बांधव

महाराष्‍ट्रात जवळपास १ सहस्र ७०० हुन अधिक गडदुर्ग, समाध्‍या, वाडे आहेत. या सर्वांचा ‘सर्वे’ करून यांना जर इतिहासाचा दर्जा द्यायचा असेल, तर आपल्‍याला महामंडळाची आवश्‍यकता आहे. हे महामंडळ कसे असावे ? याची रचना कशी असावी ? याची कार्यपद्धती कशी असावी ? याचा आम्‍ही पूर्णपणे विचार करून ठेवलेला आहे. तसे ‘ड्राफ्‍ट’ आम्‍ही मुख्‍यमंत्र्यांना १८ सप्‍टेंबर या दिवशी दिलेले आहेत. पुरातत्‍व विभाग पूर्णपणे निष्‍क्रिय झाला आहे. त्‍यामुळे आम्‍हाला गड-दुर्गांसाठी स्‍वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळ’ हवे आहे. त्‍यासाठी ३ मार्च या दिवशी गड-दुर्गांसाठी स्‍वतंत्र महामंडळ स्‍थापन व्‍हावे; म्‍हणून आपल्‍याला एकत्रित लढा द्यायचा आहे.

गडांचे संवर्धन करण्‍याऐवजी सुशोभीकरण का केले जात आहे ? – धनंजय पवार, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदवी साम्राज्‍य महासंघ

राजगडावर महाराष्‍ट्र राज्‍य पुरातत्‍व खाते पाली दरवाजा जवळील चौथरा समान अवशेषाचे दगड उचकटून काढत आहे आणि त्‍यावर फरशी लावून सुशोभीकरणाचे काम करणार आहे. जे गड शिवरायांच्‍या अस्‍तित्‍वाशी निगडित आहेत त्‍यांचे संवर्धन करण्‍याऐवजी सुशोभीकरण का केले जात आहे ? आणि कोणासाठी ? तसेच १५ फेब्रुवारीला काढलेल्‍या पुरातत्‍व खात्‍याच्‍या पत्रकात राजगडावर रहाण्‍यास बंदी घातली आहे. महाराष्‍ट्राच्‍या कानाकोपर्‍यांतून राजगड पहाण्‍यास अनेक शिवभक्‍त येत असतात. त्‍यामुळे कुठलीही कल्‍पना न देता राजगडाचे दरवाजे एका पत्रकामुळे क्षुल्लक कारणे देऊन बंद करणे म्‍हणजे आमच्‍या शक्‍तिपिठावर बंधन घालण्‍यासारखे आहे. हे सर्व थांबवण्‍यासाठी समस्‍त शिवप्रेमी, गड-दुर्गप्रेमी, समस्‍त हिंदु समाज यांनी मोठ्या संख्‍येने या महामोर्च्‍यात सहभागी व्‍हावे.

हा शौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्‍याची आवश्‍यकता ! – ऋतुजा माने, महिला कार्यकर्ता, गड-दुर्ग सेवा समिती

राजगडावरती वॉकिंग प्‍लाझा करणार आहेत, बागबगीच्‍या करणार आहेत, अशी बातमी मध्‍यंतरी वाचण्‍यात आली. या गोष्‍टींची आवश्‍यकता नाही. ज्‍या गड-दुर्गांची पडझड झाली आहे, जे बुरुज ढासळलेले आहेत त्‍यांचे पुनर्निर्माण करून तो शौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्‍याची आवश्‍यकता आहे. महाराष्‍ट्राचा जो काही इतिहास आहे, आपल्‍या पुढच्‍या पिढीला मिळणारा शौर्याचा जो काही वारसा आहे तो या गड-दुर्गांमुळेच आहे. त्‍यासाठी या गड-दुर्गांचे अस्‍तित्‍व पुष्‍कळ महत्त्वाचे आहे. हा शौर्याचा वारसा आपण जर आपल्‍या पुढच्‍या पिढीला देऊ शकलो नाही, तर त्‍याचे गुन्‍हेगार आपणच असू !