लांजा (जि. रत्नागिरी) – फाल्गुन शुक्ल द्वितीया ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच २१ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन केले जात आहे. त्यानिमित्त लांजा येथील शिवाजी चौक, साटवली रोड येथे प्रतिदिन रात्री ८.३० ते ९ या वेळेत धर्मप्रेमी एकत्र येत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कसबा येथे अटक करण्यात आली. त्यानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल करत कसबा ते वढू बुद्रुकपर्यंत त्यांची धिंड काढली आणि शेवटी शंभूराजांना वढू बुद्रुक येथे वीरमरण आले. अतोनात छळ होऊनही शंभूराजांनी हिंदु धर्म सोडला नाही कि औरंगजेबापुढे ते झुकले नाहीत. शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. तरी सर्व राष्ट्रभक्त आणि शंभूराजेप्रेमी यांनी या बलिदानमासात प्रत्यक्ष सहभागी व्हावे’, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.