Kolkata HC Granted Permission To Ram Navami Rally : हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती !

  • मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही

  • पोलिसांनी नाकारली होती अनुमती

कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी अंजनी पुत्र सेना, विश्व हिंदु परिषद आणि दुर्गावाहिनी या हिंदु संघटनांना हावडा येथे श्रीरामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारल्यानंतर या संघटनांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने मिरवणुकीला सशर्त अनुमती दिली आहे.

१. न्यायालयाने अनुमती देतांना काही अटी घातल्या आहेत. यात हावड येथील जुन्या मार्गावर श्रीरामनवमीची मिरवणूक काढता येईल; परंतु शस्त्रे घेऊन जाण्यास अनुमती दिली जाणार नाही. यासह दुचाकी फेरी आयोजित करता येणार नाही, तसेच मिरवणूक काढणार्‍यांना पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.

२. हावडा येथे गेल्या १५ वर्षांपासून श्रीरामनवमीला मिरवणूक काढण्याची परंपरा आहे;  परंतु गेली २ वर्षे या मिरवणुकीत हिंसाचार झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जी.टी. मार्गावर मिरवणुकीला अनुमती देण्यास नकार दिला.

३. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने सलग दुसर्‍या वर्षी मिरवणुकीवर बंदी घातली आहे. राज्य सरकारला ‘जय श्रीराम’ घोषणेविषयी काही अडचण आहे का ?

४. तथापि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रीरामनवमीच्या वेळी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांना पूजा करण्याचा अधिकार आहे; परंतु दंगली होऊ नयेत.

संपादकीय भूमिका

  • न्यायालय अनुमती देऊ शकते, तर पोलीस का नाही ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर जाणीवपूर्वक बंदी घालण्याचा बंगालच्या हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न आहे, हेच यातून स्पष्ट होते !
  • हिंदूंच्या उत्सवांना अनुमती नाकारणारे पोलीस कधी मुसलमानांच्या उत्सवांना अनुमती नाकारत नाहीत, हे लक्षात घ्या !