राष्ट्रोद्धारासाठी लाखो युवकांना सिद्ध करणारे व्रतस्थ पू. संभाजीराव भिडेगुरुजी !

विशेष सदर

युवकांच्या रक्तात ‘श्रीशिवाजी महाराज’ आणि ‘श्रीसंभाजी महाराज’ देशमंत्र भिनवला !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्राच्या भूमीत अशी काही अलौकीक व्यक्तीमत्त्वे आहेत, जी अखंडपणे राष्ट्र-धर्मासाठी कार्यरत आहेत. अशांपैकी सांगलीतील एक व्यक्तीमत्त्व म्हणजे ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी होय ! वयाच्या ८९ व्या वर्षीही अहोरात्र ज्यांचा श्वास हा समाजात आणि विशेषकरून तरुणांमध्ये ‘श्रीशिवाजी’ आणि ‘श्रीसंभाजी’ हे देशमंत्र भिनवण्यासाठी कार्यरत आहे, असे एकमेव पू. संभाजीराव भिडेगुरुजी ! पू. भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे कार्य गेली ४० वर्षांहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे. यात प्रामुख्याने गडकोट मोहीम म्हणजेच धारातीर्थ यात्रा, श्री दुर्गामाता दौड, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’, रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासन अन् खडा पहारा, शिवराज्याभिषेकदिन, ‘राजा श्रीशिवछत्रपति ग्रंथ’ पारायण, पुणे विद्यापिठाचे ‘जिजामाता विद्यापीठ’ म्हणून नामकरण होण्यासाठी आंदोलन, इतिहास परिषद यांसह अनेक उपक्रम राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती आणि राष्ट्रसाक्षात्कार यांच्या जाणिवा निर्माण होण्यासाठी सातत्याने वर्षभर चालू असतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

पू. भिडेगुरुजी यांचा अलौकिक परिचय

पू. भिडेगुरुजी हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी अणुविज्ञान शाखेत ‘एम्.एस.सी.’ केले आहे. पू. भिडेगुरुजी यांचे विशेषत्व म्हणजे ते अनवाणी चालतात. साध्या खोलीत रहातात, आजही ते धोतर वापरतात आणि त्यांच्याकडे अगदी मोजके कपडे आहेत. शहरातील प्रवास सायकलने आणि इतरत्र एस्.टी. बसने करतात. ते पहाटे ४ वाजता उठतात आणि कृष्णा नदीच्या घाटावर धारकर्‍यांसह सूर्यनमस्कार, जोर, दंडबैठका घालतात. ‘श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी हे धर्मकार्यासाठी शरीरसंपन्न असलेच पाहिजेत’, असा त्यांचा दंडक असतो. पू. गुरुजींनी महाराष्ट्रातील जवळपास सगळे गड पादाक्रांत केले असून त्यांना त्यांची नावे तोंडपाठ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पू. गुरुजींना मानतात. पू. गुरुजींची स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असून ते एकदा भेटलेल्या व्यक्तीला कधीही विसरत नाहीत. त्यांची वाणी अत्यंत तेजस्वी आणि धीरोदात्त असून ते नेहमीच प्रसिद्धीपासून चार हात लांब असतात. यात्रेसाठी येणाऱ्यांना सहस्रो डोंगर, दर्‍या पार करून तसेच ऊन, वारा, थंडी सहन करून कोणत्याही प्रकारचा त्रास वा इजा न होता परत घेऊन येणे, हे केवळ पू. गुरुजीच करू शकतात ! पू. गुरुजींच्या देव आणि श्रीशिवछत्रपती यांच्यावरील श्रद्धेमुळेच हे साध्य होऊ शकते.

आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, हेच आपले ध्येय ! – पू. भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असलेले अनेक मावळे प्राणार्पण करण्यासाठी सिद्ध होते. तानाजी मालुसरे यांच्यासारख्या अनेकांनी ते करून दाखवले. हा त्याग शिकण्यासाठी गडदुर्गांच्या कुशीत ही शिवाजी विद्यापिठे आहेत. ही विद्यापिठे धर्म आणि देश तारणारी आहेत. यातून आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, हेच आपले ध्येय आहे !


छत्रपती शिवाजी महाराज अनुभवायचे असणार्‍यांनी एकदा तरी गडकोट मोहीम करावी ! – रावसाहेब देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावर अनेकांनी संघटना काढल्या; पण संघटना युवकांना जातीजातीत अडकवत आहेत. खरा इतिहास न सांगता तरुणांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे ज्यांना खरे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अनुभवायचे आहेत, त्यांनी एकदा तरी गडकोट मोहीम करावी.


गडकोट मोहिमेमध्ये मार्गदर्शन केलेले मान्यवर !

समर्थ संप्रदायाचे पू. (कै.) मारुतीबुवा रामदासी, पू. (कै.) सुनील चिंचोलकर, भारताचार्य (प्रा.) पू. सु.ग. शेवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ‘स्वदेशी आंदोलना’चे जनक दिवंगत राजीव दीक्षित, इतिहास संशोधक दिवंगत निनाद बेडेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी, डॉ. सच्चिदानंद शेवडे, ‘पानिपत’कार श्री. विश्वास पाटील, स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यासक श्री. दुर्गेश परुळकर, ‘हिंदु राष्ट्र सेना’ संस्थापक श्री. धनंजय देसाई, श्री. दा.वि. कुलकर्णी. श्री. भा.ना. सरदेसाई, श्री. पंडितराव गोगटे, इतिहास व्याख्याते श्री. अमर अडके, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे डॉ. सुरेश चव्हाणके, ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. मनोज खाडये

उपस्थित राजकीय नेते : पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील, तत्कालीन वनमंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम, तत्कालीन मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे, तत्कालीन मंत्री विजय शिवतारे, तत्कालीन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांसह अनेक आमदार, खासदार, मंत्री, तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी


‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे काही महत्त्वाचे उपक्रम

१. देश आणि धर्म यांच्या उत्थानासाठी असलेली धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) !

तरुणांच्या रक्तात ‘श्रीशिवाजी महाराज’ आणि ‘श्रीसंभाजी महाराज’ देशमंत्र भिनवण्यासाठी, तसेच छत्रपती शिवरायांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी अन् तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’च्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) आयोजित केल्या जातात.

१ अ. मोहिमेचा उद्देश आणि व्याप्ती : ही मोहीम देश आणि धर्म यांच्या उत्थानासाठी असते. देशातील प्रत्येक तरुण सैनिकी बाण्याचा सिद्ध होणे आवश्यक आहे. हा तरुण श्री शिवाजी आणि श्री संभाजी या रक्तगटाचा असण्ो आवश्यक आहे. ही विद्या शिकण्यासाठी सह्याद्रीसारखे दुसरे विद्यापीठ नाही. ४ दिवस मराठमोळे तरुण एकत्र येतात. सीमेवर भारतीय सैनिक जी स्थिती अनुभवतात, ती परिस्थिती हे तरुण ४ दिवसांत अनुभवात. ही मोहीम साधारणतः १३० ते १६० किलोमीटर अंतराची असते. वर्ष २००६ पासून होणार्‍या यात्रांनी २५ सहस्र धारकर्‍यांचा आकडा ओलांडला आहे.

यात्रा प्रारंभ झाल्यावर धारकर्‍याला देव, देश, धर्म, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पलीकडे काहीच समजत नाही. गडावर छत्रपती शिवराय ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या त्या ठिकाणचा पराक्रम आठवून तेथे ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून ते प्रसंग आठवण्यात प्रत्येक तरुण मग्न होतो. आज महाराष्ट्रात मोहिमेच्या माध्यमातून १०० हून अधिक गड तरुणांनी पादाक्रांत केले आहेत.

१ आ. धारातीर्थ यात्रांमुळे अंगी मराठी बाणा : अनेक मावळे आणि क्रांतीकारक यांचे रक्त गडकोटांवर सांडले आहे. हे गडकोट छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे यांनी आपल्यासाठी ठेवलेला ‘अमूल्य ठेवा’ आहे. खडतर मार्गातून दर्‍याखोर्‍यांमधून, खाचखळग्यांमधून चालणे; उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. या व्रतामुळे अंगी मराठी बाणा येतो.

१ इ. मोहिमेची साध्यता

१. यात्रेत गेल्यावर शारीरिक क्षमतेचा कस लागतो. दर्‍याखोर्‍या, डोंगर, जंगलातील झाडे, गडकोट यांमुळे कार्यकर्ता आपण किती अंतर चाललो, याचे भान विसरतो. ४ दिवस पुरेल, एवढी शिदोरी समवेत न्यावी लागते. असे असले, तरी श्रीशिवछत्रपतींच्या पदस्पदर्शाने पुनीत झालेले गड बघितल्यावर भुकेचा विसर पडतो. जो कार्यकर्ता एक यात्रा पार करतो, तो या देशात कोणत्याही भागात भीती न बाळगता जाऊ शकतो.

२. ३ दिवस थंडी, ऊन, वारा यांचा सामना करत श्री शिवछत्रपती आणि त्यांचे मावळे कसे राहिले, वाढले, लढले हे अनुभवता येते. अनेक ठिकाणी वाटा खडतर असतात, पाणीही मिळत नाही; मात्र याचे भान कुणालाच नसते. यामुळे त्यांच्यात संघटितभाव निर्माण होण्यास साहाय्य होते. काही लष्करी अधिकार्‍यांनी ‘लष्करापेक्षाही कठीण प्रशिक्षण या मोहिमेत अनुभवण्यास मिळते’, असे अभिप्राय व्यक्त केले. पुस्तकी वाचनापेक्षा मोहिमेमुळे गड हृदयात भिनतात.

३. मोक्ष आणि समाधान यांसाठी अनेक जण तीर्थयात्रा करतात. वारकरीही पंढरीच्या वारीला निष्ठेने जातात. ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’ची वारी देश-धर्माच्या उत्थानासाठी असते. देशातील प्रत्येक तरुण सैनिकी बाण्याचा सिद्ध होणे आवश्यक आहे. हा तरुण श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराज या रक्तगटाचा असायला हवा.

२. ३४ वर्षे अखंड जपलेले ‘रायगड व्रत’ !

पू. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील धारकरी प्रतिदिन ३०० किलोमीटर अंतर कापून रायगडच्या पूजेसाठी जात आहेत. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, १४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा चालू असल्याने ती ‘रायगड व्रत’ झाली आहे. श्रीशिवछत्रपतींच्या सिंहासनाच्या ठिकाणची पूजा होत नव्हती. नागरिकांचा तन, मन, धन यांचा त्याग होणे, या उद्देशाने पूजा चालू झाली.

पूजेसाठी दोन दिवसांचे हार बसमधून सांभाळून न्यावे लागतात. गेली अनेक वर्षे ‘श्री रायगड पुष्पसागर’ दुकानाचे मालक श्री. जाधव बंधू केवळ ३० रुपयांत ११ मोठे हार देत आहेत. आज पोचलेला धारकरी रायगडावर निवास करून उद्याची पूजा पूर्ण करून परत येतो.

सध्या काही गडांवर युवक व्यसन करणे आणि अन्य चुकीच्या गोष्टी करतात. या व्रतामुळे रायगडावरील पर्यटकांवर वचक बसला आहे. अनेकांनी त्यांचा वाढदिवस, कुणाचा तरी स्मृतीदिन, विशेष दिवस रायगडावर जाण्यासाठी पकडला आहे. या व्रतामुळे सांगलीकरांची ओळख ‘छत्रपती शिवरायांचे पुजारी’ अशी झाली आहे. या व्रताला जाण्यापूर्वी, जातांना आणि तेथे गेल्यावर धारकरी ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे वाचन करतात !

या व्रतात १५ वर्षांच्या युवकांपासून ८० वर्षांहून अधिक वय असणार्‍यांचा सहभाग आहे. अनेकांच्या आता दुसर्‍या पिढ्याही या व्रतात सहभागी झाल्या आहेत.

३. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास

पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. औरंगजेबाने पकडल्याच्या दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांनी अन्न आणि पाणी वर्ज्य केले अन् एक मास कडवी झुंज दिली. त्यांच्या बलीदानाची आठवण म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’च्या वतीने प्रतिवर्षी फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत ‘धर्मवीर बलीदानमास’ पाळण्यात येतो.

फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे करून त्यांना ठार मारण्यात आले. त्या वेळी त्यांची अंत्ययात्रा निघू शकली नाही. त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून फाल्गुन अमावास्येला मूकपदयात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो. या बलीदानाच्या स्मरणार्थ धारकरी एक मास पायात चप्पल न घालणे, मुंडण करणे, दूरचित्रवाहिनी न पहाणे यांसह आवडत्या वस्तूचा त्याग करतात.

४. दुर्गामाता दौड

दुर्गामाता दौड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्तातील आग, लढाऊपणा पू. गुरुजींच्या जीवनात प्रतिक्षण जाणवतो. त्यांच्या रक्तातील देश, धर्म यांविषयीची पोटतिडीक आणि कळवळा दौडण्यातून दिसतो. तीच वृत्ती तरुण पिढीत येण्यासाठी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता ही दौड प्रारंभ होते.

नवरात्रीच्या कालावधीत हिंदू ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर नवरात्र पाळतो, त्याप्रमाणे ‘देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सामाजिक नवरात्र पाळले पाहिजे आणि ते म्हणजे ‘श्री दुर्गामाता दौड’ होय. या दौडीत अग्रभागी भगवा ध्वज असतो. शिवतीर्थापासून प्रथम धारकरी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्रीदुर्गामाता मंदिरापर्यंत दौडत जातात. येथे श्री दुर्गामातेची आरती होते. यानंतर श्री दुर्गामातेचा आशीर्वाद घेऊन वेगवेगळ्या मार्गांवरून धारकरी विविध स्फूर्तीगीते म्हणत जातात. ही दौड केवळ महाराष्ट्रातच नाही, तर तिचा गोवा, कर्नाटक यांसह अन्य राज्यांमध्येही विस्तार झाला आहे.


पू. भिडेगुरुजींच्या संपर्कात आल्यानंतर तरुणांमध्ये झालेले पालट

पू. भिडेगुरुजीं तरुणांना मार्गदर्शन करतांना

पू. भिडेगुरुजींच्या संपर्कात येण्याअगोदर अनेक तरुणांना देव, देश, धर्म यांच्याप्रतीची जाणीव नव्हती. मंडळाच्या नावाखाली कार्यकर्त्यांना मौजमजा करणे एवढेच ठाऊक असायचे; मात्र पू. गुरुजींच्या सहवासाने हे सर्व पालटते. ‘प्रत्येक तरुणाने देशकार्यासाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःचा संसार करतांना देशाचा संसार कसा करावा’, ही शिकवण पू. गुरुजी भिनवतात. त्यामुळे सहस्रो धारकर्‍यांचे जीवन कृतार्थ बनले आहे.