मातीचा भराव टाकणे आणि अनधिकृत बांधकामे यांविरोधात गोवा शासनाची मोहीम

महामार्गाच्या बाजूच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाईचा आदेश

पणजी, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – महामार्गाच्या बाजूला अनधिकृतपणे मातीचा भराव टाकणे आणि मोठ्या प्रमाणावर वाढत असलेली अनधिकृत बांधकामे यांवर कारवाई करण्यासाठी नेमलेले अधिकारी त्यांची सेवा व्यवस्थित बजावत नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे गोवा सरकारने संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि भरारी पथक यांना विशेष अधिकार बहाल करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

शासकीय अधिकार्‍यांनी अशा प्रकरणी कारवाई न करणे म्हणजे अनधिकृत कामांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. सरकारने २१ फेब्रुवारी या दिवशी हे परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी विशेष अधिकार बहाल केलेल्या अधिकार्‍यांनी रस्त्याचे रूंदीकरण केलेला भाग, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यस्तरीय महामार्ग या ठिकाणी त्वरित पहाणी करावी. अनधिकृत बांधकाम केलेले आढळल्यास कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून तेथील स्थिती पूर्ववत करावी.