गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना, ३ मार्च या दिवशी मुंबईत निघणार महामोर्चा !

डावीकडून राहुल खैर, वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, सुनील घनवट, रणजित सावरकर आणि प्रभाकर भोसले

मुंबई, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या सामर्थ्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते गड-दुर्ग हे अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत. यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात आता दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दंड थोपटले असून उत्स्फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. ३ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता या समितीच्या वतीने राज्यस्तरीय पहिला महामोर्चा काढण्यात येणार आहे. मेट्रो आयनॉक्स सिनेमा ते आझाद मैदान असा हा भव्य मोर्चा निघणार आहे.

२१ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे गडप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्रित येऊन हा महामोर्चा यशस्वी करण्याचा निश्चय केला. विविध २९ संघटनांचे ५५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाचे धर्मसभा-विद्वसंघाचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले आणि मराठा वॉरियर्सचे अध्यक्ष श्री. राहुल खैर हे उपस्थित होते.

मोर्च्याच्या बैठकीला उपस्थित शिवप्रेमी

शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज मोर्च्यात सहभागी होणार !

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत लढणार्‍या पराक्रमी मावळ्यांचे वंशज या महामोर्च्यात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत गडांवरील अतिक्रमण हटवण्याचा विषय तडीस जात नाही, तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे, अशी माहिती श्री. सुनील घनवट यांनी या वेळी सांगितली.

सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन ही मोहीम घ्यावी ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

महाराष्ट्रातील गड-दुर्ग हा पराक्रमाचा इतिहास आहे. हा इतिहास जागृत ठेवण्याचे दायित्व आपले आहे. सर्व मावळ्यांनी एकत्रित येऊन ही मोहीम घेणे आवश्यक आहे. यामध्ये आश्वासने मिळतील; मात्र ती पूर्ण करून घेण्यासाठी हिंदूंनी संघटित शक्ती दाखवून द्यायला हवी. आतापर्यंत अनेक सरकारे आली आहेत; परंतु गड-दुर्ग यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हे शल्य या मोर्च्यातून आपणाला प्रकट करायचे आहे.  दुर्गप्रेमींनी रस्त्यावर उतरून आपली शक्ती दाखवून द्यायला हवी.

गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे शिवरायांचे कार्य चालू ठेवूया ! – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, अध्यक्ष, धर्मसभा-विद्वत्संघ, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पीठ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड-दुर्ग हे हिंदुत्वाचे सामर्थ्य आहे. रायगडाचा उल्लेख हा ‘जगदिश्वराच्या प्रासादामध्ये नरश्रेष्ठाचा वास’ असा केला जातो. त्यामुळे गड-दुर्ग ही देवतांची अधिष्ठाने आहेत. गड-दुर्ग हे धर्म नियंत्रणाच्या व्यवस्थेमधील स्थाने आहेत. धर्म नष्ट झाला, तर अराजक निर्माण होईल. त्यामुळे अतिक्रमण हटवणे, हे छत्रपती शिवरायांचे कार्य मावळे होऊन आपण पुढे चालू ठेवले पाहिजे.

मावळ्यांनो, राज्यभरातून मोर्च्यात सहभागी व्हा ! – सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक समिती

ज्याप्रमाणे अफझलखानाच्या कबरीच्या भोवतीचे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडांवरील अतिक्रमणे पाडली पाहिजेत. गडांवरील इस्लामी अतिक्रमण कोणत्याही मावळ्याला पटणार नाही. याविरोधात मावळे पेटून उठले आहेत. राज्यात कुठेही असाल, तरी या मोर्च्यात सहभागी व्हा.

महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीमध्ये कार्यरत गड-दुर्ग प्रेमी

 बैठकीत सहभागी संघटना !

वज्रदल (धारावी), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भंडारी मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मावळा प्रतिष्ठान, शिवराज्याभिषेक समिती, दुर्गपंढरी सामाजिक संस्था, स्वतंत्र सवर्ण सेना, दुर्गवीर प्रतिष्ठान, धर्मसभा विद्वत्संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री विठ्ठल-रखुमाई सेवामंडळ, युवा मराठी महासंघ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, अखिल भारतीय मांगेला समाज, मराठा वॉरियर्स, रायगड संवर्धन प्रतिष्ठान मुंबई, राज्याभिषेक समिती, मानवसेवा प्रतिष्ठान, दगडांच्या देशा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा

विशेष : महाराष्ट्रात ३ सहस्रांपेक्षा अधिक गिर्यारोहक संघटना आहेत. या सर्वांना मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार असल्याचे या वेळी गिर्यारोहक श्री. गोपाळ जोरी आणि त्यांचे अन्य गिर्यारोहक मित्र यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले शिवकार्य यशस्वी करण्यासाठी महामोर्च्यात सहभागी व्हा ! – राहुल खैरे, अध्यक्ष, मराठा वॉरियर्स

छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झाले गड-किल्ले ।
त्या मातीचा लावून टिळा चला जतन करूया गड-किल्ले ।।

येत्या ३ मार्चला मी मुंबईतील आझाद मैदानात होणार्‍या महामोर्च्यामध्ये सर्व गडप्रेमी, शिवप्रेमी, गड-दुर्ग संवर्धक यांनी एकत्र येऊन मोर्च्याची भव्यता वाढवावी. गड-दुर्ग यांवर होत असलेले अतिक्रमण थांबवण्यासाठी सर्व संघटना आणि शिवप्रेमी यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले शिवकार्य अन् ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटित व्हावे.

छत्रपतींचे गड-दुर्ग आपलेच आहेत, हे लक्षात घेऊन प्रत्येकाला मोर्च्याचे निमंत्रण द्या ! – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा. या प्रमुख मागण्या मोर्च्याद्वारे करण्यात येणार आहेत. छत्रपतींचे गड-दुर्ग आपलेच आहेत, हे लक्षात घेऊन प्रत्येकाला मोर्च्याचे निमंत्रण द्या, तसेच सहकुटुंब मोर्च्यामध्ये सहभागी व्हा !