कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

ब्रिटनच्या एका चर्चासत्रात भारतीय वंशाच्या महिला पत्रकार नरिंदर कौर यांचा रोखठोक प्रतिवाद !

लंडन (इंग्लंड) – स्वातंत्र्यानंतर अनेकदा कोहिनूर हिरा ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी झाली आहे. आता हे सूत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची पत्नी आणि राणी कॅमिला यांनी राणी एलिझाबेथचा कोहिनूर हिरा जडलेले मुकुट न घालण्याचा निर्णय घेतला होता. यावर आयोजित एका प्रसिद्ध टी.व्ही. शोमध्ये या सूत्रावर चर्चा झाली. या वेळी लेखिका आणि निवेदक एम्मा वेब आणि भारतीय वंशाच्या पत्रकार नरिंदर कौर यांच्यात शाब्दिक वाद झाला. चर्चेच्या वेळी एम्मा वेब यांनी म्हटले की, हिर्‍याच्या मालकीविषयी गोंधळ होऊ शकतो. उत्तरात नरिंदर कौर यांनी त्यांना इतिहासाचा धडा वाचण्याचा सल्ला दिला.

१. एम्मा वेब यांनी युक्तीवाद मांडत सांगितले की, त्या वेळी लाहोरवर शीख साम्राज्यही राज्य करत होते. त्यामुळे पाकिस्तानही कोहिनूर हिर्‍यावर दावा करणार का ? शीख साम्राज्याने कोहिनूर हिरा इराणच्या साम्राज्यातून चोरला होता आणि इराणी साम्राज्याने मोगल शासकांवर आक्रमण करून तो हिसकावून घेतला होता. त्यामुळे कोहिनूर हिर्‍याच्या मालकीवरून वाद चालू आहे.

२. यावर कौर म्हणाल्या, ‘तुम्हाला इतिहास ठाऊक नाही. ही कल्पना वसाहतवाद आणि रक्तपात दर्शवते. हा कोहिनूर हिरा भारताला परत द्या !’

३. यानंतर कौर यांनी कोहिनूर हिरा भारताच्या मातीत सापडल्याचे म्हटले. हा हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो. वसाहतवादातून मिळवलेला हा हिरा ठेवण्याचा त्यांना अधिकार नाही !

____________________________________

संपादकीय भूमिका

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !