पुणे – जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने गावागावांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ सहस्र ६३२ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील ६१ सहस्र १७३ एवढ्या खातेदारांकडून ही रक्कम मिळाली आहे. (मोठ्या रकमेची थकबाकी शेष राहीपर्यंत जिल्हा परिषदेचे अधिकारी काय करत होते ? त्या त्या वेळी रक्कम वसूल का करण्यात येत नाही ? – संपादक)
पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२ सहस्र ८३७ खातेदारांनी मिळून एकूण ४२ लाख २८ सहस्र ८३२ रुपयांचा कर भरला आहे. या लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक ६ कोटी ५६ लाख ८७ सहस्र ५३५ रुपयांची करवसुली ही मावळ तालुक्यात झाली. या लोक अदालतींमुळे ग्रामपंचायत करांची थकबाकी वसूल करण्यास ग्रामपंचायतींना मोठा आधार मिळाला आहे. भविष्यातही अशा पद्धतीने लोक अदालतीचे आयोजन करून करथकबाकी वसुलीची मोहीम राबवली जाणार आहे.