सातारा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – स्तनदा मातांना बाळांना पाजण्यासाठी सुरक्षित ‘फीडिंग कॉर्नर’ (बाळांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष) लवकरच कार्यान्वित करण्याात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिली.
इंदुराणी दुबे यांनी नुकतीच सातारा रेल्वेस्थानकाला सदिच्छा भेट देत पडताळणी केली. पडताळणी झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी इंदुराणी दुबे म्हणाल्या की, आम्ही सातारा रेल्वेस्थानकाशी संबंधित अधिकारी आणि सल्लागार समिती सदस्य यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. सातारा शहरातील बस आणि रेल्वेच्या वेळापत्रकांत समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन, चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच रेल्वेस्थानकावर स्ट्रॉबेरी विकण्याविषयी लेखी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांमध्ये सी.सी.टी.व्ही. छायाचित्रक बसवण्याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.