खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णखाटांची संख्या दुप्पट केली !

नवी मुंबई – कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मनुष्यबळाची संख्या २ सहस्र ४०५, तर रुग्णखाटांची संख्या ९३० करण्यात आली आहे.

कर्करोगावर उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. सध्या येथे २ इमारतीत रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला, लहान मुले यांचे कर्करोग केंद्र कार्यान्वित आहे. येथील खाटांची संख्या ४०० एवढी आहे. वाढती रुग्णसंख्या आणि आधुनिक तंत्रप्रणाली उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फोईड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सर रुग्णांची पूर्तता करणारे देशातील सर्र्वांत मोठे केंद्र या ठिकाणी वर्ष २०२४ मध्ये कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अनुषंगाने या हॉस्पिटलमध्ये १९ ऑपरेशन थिएटरमुळे १० सहस्र मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया आणि ५ सहस्र रुग्णांना रेडिएशन थेरपी, २५ ते ३० सहस्र केमो थेरपी उपचार घेऊ शकणार असून अनुमाने ३ लाख रुग्ण उपचार घेऊ शकणार आहेत.