असे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…!

देश धरम पर मिटने वाला । शेर शिवा का छावा था ।। महापराक्रमी परम प्रतापी । एक ही शंभू राजा था ।।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्यरक्षक’ कि ‘धर्मवीर’ ? अशी राळ समाजात उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उगाच चर्चेला तोंड फोडले आहे. तसे पहाता या दोन्हीही प्रचलित शब्दांमध्ये कुठलाच कधी भेद नव्हता. या दोन्ही विशेष उपाधींना जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारी किनार लाभलेली; परंतु छत्रपती संभाजी महाराज हे ‘सर्वधर्मीय पुरस्कर्ते कसे होते ?’, हे उगाच ठासून अधोरेखित करण्यासाठी हा भलता खटाटोप केला जात आहे. या प्रयत्नांतून त्यांना ‘धर्मवीर संबोधू नये’, हेच देशाला न पटण्याजोगे आहे; कारण महाराजांचे हिंदु धर्माविषयीचे अपार कार्य, हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख आणि निखळ सुंदर आहे.

श्री. आनंद बेंद्रे

 १. शंभूराजांचे बलीदान विसरणे, म्हणजे षंढासारखे जगणे

शंभूराजांविषयी कवित्व गाणार्‍या ‘देश धरम पर मिटने वाला…’ या महान काव्यपंक्ती महाराजांची हिंदु धर्माविषयी असणारी तळमळ, अतोनात प्रेम आणि निष्ठा अधोरेखित करतात. त्यामुळे ‘महाराज सर्वधर्मीय पुरस्कर्ते होते’, हे सूत्रच येथे दुय्यम ठरते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाच्या क्रूरपणाची कथा वाचतांना आजही अंगावर काटा उभा रहातो, डोळ्यांत अश्रू दाटतात आणि कपटी मुसलमानी औरंगजेबाविरुद्ध संताप निर्माण होतो. जर कुणाला या बलीदानाच्या क्रौर्याचा विसर पडलाच, तर त्याचे जगणे षंढाहून वेगळे नसावे ?

२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाया ‘हिंदु विरुद्ध मुसलमान धर्म’, अशाच लढल्या गेल्या !

‘छत्रपती संभाजीराजेंनी हिंदु धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारावा’, यासाठी जिवंतपणी त्यांची कातडी सोलणारा, तप्त निखार्‍यातील सळई डोळ्यांत खुपसणारा, धिंड काढणारा हा मुसलमान धर्माचाच होता. याहून पापी तो कोण असावा ? आज उगाच ‘औरंगजेब, अफझलखान हे मुसलमानांमधील केवळ एक वृत्ती होती आणि आपले राजे हे मुसलमानांविरुद्ध नाही, तर या वाईट वृत्ती विरुद्ध लढले. सर्व मुसलमान वाईट नव्हते’, हे दर्शवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. काही क्षणांसाठी हे गृहीत धरू की, ती वाईट वृत्ती होती. मग तशी ती केवळ औरंगजेबाच्या अंगी असायला हवी होती; पण इतिहासात औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझलखान हे सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी कसे चालून आले ? वृत्ती म्हटली, तर हाताची ५ ही बोटे सारखी नसतात. या आक्रमकांच्या फौजांनी आक्रमण करून हिंदु मंदिरे उद्ध्वस्त केली, देवतांच्या मूर्ती फोडल्या, हिंदु महिलांची विटंबना करून प्रचंड अत्याचार केले. त्यामुळे तेव्हाचे हे लढे ‘हिंदु धर्म विरुद्ध मुसलमान धर्म’, असेच लढले गेले, हे विसरता येणार नाही. त्यामुळे याला उगाच वृत्तीचा लेप नको.

३. छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणून नाकारणे हा मोठा द्रोह !

दोन्हीही महाराजांच्या चाकरीत मुसलमान कामावर असणे, हे तेव्हाच्या परिस्थितीनुसार योग्यच असावे. अगदी तसेच हिंदूही मुसलमान फौजांमध्ये चाकरी करत होते, ते केवळ पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी, अमुक एका धर्मावर प्रेम होते म्हणून नव्हे ! पोशिंदा असल्याने राजाप्रती निष्ठा असणे स्वाभाविक होते. याचा अर्थ महाराजांना मुसलमान धर्माविषयी पुष्कळ पुळका होता असे नाही. त्यांच्या मनाचा तो मोठेपणा असावा, तो मोठेपणा हिंदु धर्माविषयी औरंगजेब आणि अफझलखान यांना कधीच जोपासता आला नाही. कुठे गेला तो सर्वधर्मीय आदर तेव्हा ? म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे ‘हिंदवी स्वराज्यरक्षक, हिंदु धर्मवीर होते आणि सदैव असणारच’, हे नाकारणे हाच मोठा द्रोह आहे.

४. सामान्यांकडून बहाल होते ‘धर्मवीर’ पदवी !

याविषयीची दुसरी बाजू माध्यमांवर मांडतांना ‘स्वराज्यरक्षक’ शब्दाची उकल करून देतांना आणि ‘धर्मवीर’ शब्दाला ठाम विरोध करतांना अजित पवार सहज बोलून गेले, ‘‘सध्या काय कुणालाही धर्मवीर संबोधले जाते ! त्याचे महत्त्व लयास जाते ? आता तर म्हणे, ‘धर्मवीर भाग २’ हा चित्रपट येत आहे.’’ येथे पवार हे विसरत आहेत की, ‘धर्मवीर’ ही काही वाटण्याजोगी खिरापत नाही. ते बिरुद मिरवणाराही तेवढाच शक्तीशाली असावा लागतो. छत्रपती संभाजी महाराज तसे होते. जर एका धर्मविराच्या प्रेरणेतून दुसर्‍या हिंदु धर्मविराने जन्म घेतला असेल, तर त्यात चुकीचे काय ? संभाजीराजेही हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढले. जेव्हा जेव्हा शासन दुर्बल ठरते, न्याय संस्था विकाऊ होऊन बसते, कुचकामी ठरते, तेथे अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणारी समांतर व्यवस्थाच प्रबळ होते आणि सामान्यांमधून ‘धर्मवीर’ ही पदवी आपोआप बहाल होते. त्यात वावगे काय ?

५. आकाशात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत छत्रपती संभाजीराजे ‘धर्मवीर’च !

इतिहासातील हिंदु धर्मावरील मुसलमानी अत्याचारांकडे जाणूनबुजून डोळेझाक करायला लावून थोर संभाजीराजेंना ‘धर्मवीर’ न संबोधणे; म्हणजे जिवंतपणी मेल्याचे लक्षण ! हिंदु धर्मासाठी प्राणांचे बलीदान देणारे छत्रपती संभाजी महाराज, हे जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जातील. कुणी काय म्हणावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून नव्हे, तर कुणी सांगण्यापेक्षा आमच्या सळसळत्या रक्तात ‘हिंदु धर्मवीर’ हा शब्द भिनलेला आहे. इतिहासातील जुलमी मुसलमानी अत्याचारांविरुद्ध डोळ्यात संतापाचा भगवा अंगार आहे.

– श्री. आनंद बेंद्रे, पुणे (३१.१.२०२३)

संपादकीय भूमिका

छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलिदान नाकारणे हा इतिहासद्रोहच !