ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ?

कर्नाटकातील पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांचे प्रश्‍न !

मुद्दुरू – ब्राह्मण मुख्यमंत्री होणार असतील, तर होऊ द्या. ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये, असे कुठे आहे ? ते भारताचे नागरिक नाहीत का ?, असे प्रश्‍न उडुपी पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी केले आहेत. माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी ब्राह्मणांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना हे प्रश्‍न उपस्थित केले.

विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच ! ब्राह्मण असणारे कुणीच या विरुद्ध आवाज उठवत नाहीत. ब्राह्मणांकडे संख्याबळ अल्प आहे. ब्राह्मण अल्पसंख्य आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलले तरी चालते; म्हणूनच काही जण बोलतात. जनता दल (निधर्मी)चे कुमारस्वामी यांनी किती ब्राह्मणांना निवडणुकीचे तिकीट दिले ? ब्राह्मणांवर टीका करणारे वाट्टेल ते बोलतात. अशांनी पुरावा देऊनच त्यांच्या विरोधात बोलावे. एखाद्या व्यक्तीच्या चुकीसाठी संपूर्ण समाजाला दोष देणे, असे इतर समाजातील व्यक्तींविषयी का होत नाही ? प्रजासत्ताक समाजात कुणावरही अन्याय होऊ नये. प्रजासत्ताक समाजात अशा रीतीने कोणत्याही धर्मावर टीका करणे योग्य नाही.

काय म्हणाले होते कुमारस्वामी ?

यापूर्वी एच्.डी. कुमारस्वामी म्हणाले होते, ‘रा.स्व. संघाने ठरवलेले कर्नाटकचे ब्राह्मण मुख्यमंत्री (प्रल्हाद जोशी) हे आमच्या जुन्या कर्नाटकातील ब्राह्मण नाहीत. ते (प्रल्हाद जोशी) महाराष्ट्रातील पेशव्यांशी संबंधित आहेत ज्या पेशव्यांनी शृंगेरी मठ पाडले होते.’

‘कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यावर भाजपचे केंद्रातील मंत्री प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील’, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कुमारस्वामी यांनी हे विधान केले होते.