धारावी येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांची पदावरून उचलबांगडी !

पोलिसांच्‍या कह्यात असलेले गोवंशियांचे मांस गायब झाल्‍याचे प्रकरण

मुंबई, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – धारावी येथे अवैधरित्‍या विक्रीसाठी आणलेले २ सहस्र किलो गोवंशियांचे मांस गोप्रेमींनी पकडून दिले होते. यांतील ५०० किलो गोवंशियांचे मांस धारावी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांच्‍या देखरेखीखाली असतांना ते गायब झाले होते. यानंतर प्रदीप सालेकर यांची पोलीस निरीक्षक पदावरून उचलबांगडी करून त्‍यांची नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्‍ती करण्‍यात आल्‍याची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला उपलब्‍ध झाली आहे. त्‍याविषयी अपर पोलीस आयुक्‍त अनिल कुंभारे यांचा २ फेब्रुवारी या दिवशी काढलेला आदेश दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्‍त झाला आहे.

१. विश्‍व हिंदु परिषदेचे मुंबई विभागाचे सहमंत्री श्री. राजीवकुमार चौबे यांच्‍या तक्रारीनंतर या प्रकरणी साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त गंभीरे यांच्‍याद्वारे या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

२. पोलिसांच्‍या कह्यातून मांस गायब झाले असतांना मागील १ मासापासून या प्रकरणाची चौकशी संपली नसल्‍याचे, तसेच या प्रकरणाचे सविस्‍तर वृत्त १७ जानेवारी या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये देण्‍यात आले होते.

३. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने अन्‍वेषण अधिकारी गोविंद गंभीरे यांना दूरभाष केला असता मांस गायब झाले नसून शीतकपाटात असल्‍याची खोटी माहिती दिली होती. गोविंद गंभीरे यांनी दिलेल्‍या खोट्या माहितीची गंभीर नोंद घेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या पदाधिकार्‍यांनी या प्रकरणी वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांकडे विचारणा केली होती.

४. विशेष म्‍हणजे प्रदीप सालेकर यांच्‍यासह धारावी पोलीस ठाण्‍याचे साहाय्‍यक पोलीस निरीक्षक वैभव कदम, पोलीस उपनिरीक्षक महंमद उमेर आयाज खान, पोलीस शिपाई अशोक साबळे आणि पोलीस निरीक्षक राजेश चंदनशिवे या सर्वांची पदावरून उचलबांगडी करून त्‍यांची नियंत्रण कक्षामध्‍ये प्रतिनियुक्‍ती करण्‍यात आली आहे. (विविध प्रकरणांत आरोपी असलेल्‍या पोलिसांना नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्‍ती दिली जाते. अल्‍प महत्त्वाच्‍या समजल्‍या जाणार्‍या नियंत्रण कक्षात नियुक्‍ती ही एकप्रकारे शिक्षा समजली जाते.)

काय आहे प्रकरण ?

२५ डिसेंबर २०२२ या दिवशी सकाळी श्री. राजीवकुमार चौबे आणि त्‍यांचे मित्र आशिष कमलाकांत, आशिष बारीक, नवनाथ पाटील यांनी धारावी येथील अशोक मिलनाका येथे गोवंशियांचे मांस अवैध विक्रीसाठी घेऊन येत असलेला टेंपोे पोलिसांच्‍या साहाय्‍याने पकडून दिला. या प्रकरणी श्री. चौबे यांनी केलेल्‍या तक्रारीनंतर धारावी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. या प्रकरणी मांसाची अवैध वाहतूक करणारा टेंपोचालक वसीम सत्तार अत्तार आणि अवैधरित्‍या मांसविक्री करणारा गाळ्‍याचा मालक आबिद रफिक कुरेशी यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. श्री. चौबे यांच्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी टेंपोतील २ सहस्र किलो मांस कह्यात घेतले. गोरक्षकांच्‍या साहाय्‍याने या मांसाची विल्‍हेवाट लावण्‍यात आली; परंतु गोदामात असलेले ५०० किलो मांस पोलिसांनी कह्यात घेतलेच नाही. या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांच्‍या आदेशाने पोलीस पहारा ठेवण्‍यात आला होता; मात्र तरीही हे मांस गायब झाले होते.

संपादकीय भूमिका 

कर्तव्‍यचुकार पोलिसांची पदावरून उचलबांगडी करणे पुरेसे नसून त्‍यांना बडतर्फ करून कारागृहात डांबणे आवश्‍यक !