कोल्हापूर, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली आहे, त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये; म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १७ फेब्रुवारीला रात्री ९ ते १२ या वेळेत भजन-जागर, तसेच १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ९ ते १० दुर्गसेवक-गोरक्षक यांचा सत्कार आणि जगद़्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. मोरे महाराज (देहू, आळंदी) यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११.३० वाजता महाआरती होऊन सर्वांना महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी अधिकाधिक दुर्गप्रेमी, शिवप्रेमी यांनी पावनगडावर यावे, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी यांनी पत्रकार परिषदेत केले.
या प्रसंगी बजरंग दल शहर संयोजक श्री. पराग फडणीस, सहसंयोजक श्री. अक्षय ओतारी, डॉ. अश्विनी माळकर, श्री. राजेंद्र मकोटे, श्री. तुषार भिवटे उपस्थित होते.
अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी पुढे म्हणाले, ‘‘यंदा तेथे पंचक्रोशीतील संघटना, नागरिक यांच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम होत असल्याने विश्व हिंदु परिषद कोणतेही आंदोलन अथवा करसेवा करणार नाही.’’