देव आणि देश सेवेत मग्‍न रहा ! – श्री श्री रविशंकर

सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – देवभक्‍ती आणि देशभक्‍ती या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. प्रत्‍येकात देवभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती असलीच पाहिजे. तुम्‍ही सर्वजण देव आणि देश सेवेत मग्‍न रहा. तुमच्‍या जीवनात कशाचीही कमतरता रहाणार नाही, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग’चे संस्‍थापक श्री श्री रविशंकर यांनी केले.

माण तालुक्‍यातील श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील तीर्थक्षेत्र फाऊंडेशन, ग्रामस्‍थ आणि आर्ट ऑफ लिव्‍हिंग परिवाराच्‍या वतीने आयोजित कोटी लिंगार्चन सोहळ्‍याच्‍या मंडप पूजन अन् धर्म ध्‍वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील प्रतिष्‍ठित मान्‍यवर उपस्‍थित होते.

या वेळी श्री श्री रविशंकर म्‍हणाले की, आज देवांच्‍या ध्‍वजाचे आरोहण झाले आहे. त्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या जीवनात देवतांचा प्रभाव पडून सुख, शांती, समृद्धी येणार आहे. सर्वांचे दुःख घेऊन जाण्‍यासाठी मी येथे आलो आहे. सत्‍संगामधून जातांना कुणाच्‍याही मनात दुःख नको. प्रसन्‍न होऊन येथून जा. गुरूंच्‍या जवळ का जातात ? तर दुःखाचा नाश करण्‍यासाठी आणि सर्व समृद्धी मिळवण्‍यासाठी ! गुरूंच्‍या जवळ आल्‍यावर कोणत्‍याही कारणाविना सुखाची अनुभूती येते. ‘सर्व सुखी राहोत’, हीच संतांची भावना असते. जिथे भक्‍ती, साधना आहे, तिथे शारीरिक मानसिक आणि आत्‍मिक शक्‍ती वाढण्‍यास साहाय्‍य होते. आपल्‍या आद्य दैवतांचे स्‍मरण आणि भजन आपल्‍यातील शक्‍ती जागृत करण्‍यासाठी करा.