अमेरिकेने नष्ट केला हेरगिरी करणारा चीनचा ‘बलून’

चीनकडून अमेरिकेचा निषेध !

(‘बलून’ म्हणजे मोठ्या आकाराचा फुगा)

वॉशिंग्टन / बीजिंग – अमेरिकेने त्याच्या देशात हेरगिरी करणारा चिनी ‘बलून’ (मोठ्या आकाराचा फुगा) नष्ट केला आहे. अमेरिकेच्या हवाई सीमेमध्ये हा बलून दिसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तो नष्ट करण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार अमेरिकेच्या वायूदलाने ‘एफ्-२ या लढाऊ विमानाद्वारे क्षेपणास्त्र डागून तो नष्ट केला. यासाठी या बलूनला दक्षिण कॅरोलिनाच्या अटलांटिक महासागरापर्यंत नेण्यात आले. तिथे त्याच्यावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या घटनेमुळे मात्र अमेरिका-चीन यांच्या राजकीय संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बलून नष्ट करण्याच्या दोन दिवस आधी चीनने तो त्याचाच बलून असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रहित केला होता.

अमेरिकेने बलून नष्ट केल्यावर चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, ‘अमेरिकेने शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवायला हवा होता’, असे आम्हाला वाटत होते; मात्र अमेरिकेने आमचा बलून नष्ट केला. आम्ही या घटनेचा निषेध करतो. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. चीन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे. आमचे बलून चुकून अमेरिकेच्या सीमेत गेले होते. याविषयी अमेरिकेसमवेत आम्ही अनेकदा चर्चा केलेली आहे. हा एक अपघात होता. आमच्या बलूनमुळे अमेरिकेच्या सैन्याला कोणताही धोका नव्हता.

हेरगिरी करणारे बलून म्हणजे काय ?

हेरगिरी करणारे ‘बलून’ हा हेरगिरीच्या उपकरणांचा एक प्रकार आहे. हेरगिरी करणारा कॅमेरा हा निर्धारित क्षेत्राच्या वर तरंगणार्‍या फुग्याच्या खाली लावलेला असतो, वार्‍याच्या प्रवाहाने हा फुगा वाहून नेला जातो. फुग्याशी जोडलेल्या उपकरणांमध्ये रडारचा समावेश असू शकतो आणि ती सौरऊर्जेवर चालणारे असू शकतात. फुग्याविषयी संशय येण्याचे प्रमाण अल्प असते. बलून उपग्रहांप्रमाणे सातत्यपूर्ण पाळत ठेवत नाहीत; परंतु त्यांच्या माध्यमातून माहितीची पुनर्प्राप्ती करणे सोपे असते. हे प्रक्षेपण उपग्रहाच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहे.