पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक खालावत चालली आहे. २८ जानेवारी या दिवशी तेथील पेट्रोलच्या किमती ४५ ते ९० रुपयांनी वाढल्या. ‘केवळ २० टक्के पेट्रोलपंपांवरच पुरेसे पेट्रोल उपलब्ध आहे’, असे तेथील ‘जियो न्यूज’ वाहिनीने सांगितले, तर काही अधिकार्यांनी या अफवा असल्याचे सांगितले. पाकने त्याची स्थिती एवढी वाईट करून घेतली आहे की, त्याचा चीनसारखा पारंपरिक मित्रही आता त्याच्या साहाय्याला पुढे येतांना दिसत नाही. या घडीला भारताची भूमिका मात्र मोठी निर्णायक ठरणार आहे. भारताला गेली ७५ वर्षे अंतर्बाह्य छळून त्याचे लचके तोडणार्या पाकच्या या स्थितीत भारताने घेतलेली भूमिका इतिहास घडवू शकणार आहे. त्यामुळे केवळ पाकचीच नव्हे, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचीही आता मोठी परीक्षा आहे.
पाकची सद्यःस्थिती !
पाकमध्ये खाण्या-पिण्याच्या साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गव्हाचे पीठ आणि डाळ हेही तेथील लोकांना परवडत नाही, अशी स्थिती आहे. स्वयंपाकाचा गॅस १० सहस्र रुपये झाला आहे. पाकमधील नेते आणि श्रीमंत लोक महागडे कपडे घालून फिरत आहेत अन् जनतेची मात्र अन्नान दशा होत आहे. त्यामुळे साहजिकच जनतेचा रोष वाढला आहे. इंधनाच्या अभावी पाकमधील उद्योग आणि व्यवसाय बंद पडू लागले आहेत. कितीतरी कारखान्यांत केवळ काही घंटेच काम होत आहे. त्यातच मागील आठवड्यात १२ घंट्यांहून अधिक वेळ पाकमधील वीज गेल्याने त्याचा गंभीर परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. सद्यःस्थितीला पाकिस्तानच्या बंदरांमध्ये सामानाचे कंटेनर पडून आहेत. पाकमधील विदेशी मुद्रा भांडार (परकीय चलन) अतिशय न्यून झाल्याचा हा परिणाम सांगितला जात आहे. पाकचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी पाकची इंधनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी थेट रशियाची वाट धरली आहे. रशिया आणि पाक यांच्यामध्ये इंधनाविषयी करार होऊन पाकला काही अंशी साहाय्य होऊ शकते; मात्र यात रशिया त्याचा लाभ करून घेतल्याविना काही रहाणार नाही, हेही वास्तव आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे (‘आय.एम्.एफ्.’चे) पाकने साहाय्य घेतले, तर एक वेळ पाक या दुःस्थितीतून तरून जाण्याची थोडीशी शक्यता आहे; परंतु हे साहाय्य घेतले, तर त्यांच्याकडून पाकवर काही जाचक अटी लादल्या जातील. ‘जनतेवर कर लादणे’, यांसारख्या अटी पाक सरकार एक वेळ मान्य करीलही; परंतु त्यामुळे तेथील जनतेतील असंतोष वाढून ती रस्त्यावर उतरण्याचीच शक्यता दाट आहे. मागील वर्षी नाणे निधीकडून घेतलेल्या ‘पॅकेज’मुळे तेथील जनतेकडून झालेला मोठा विरोध अद्यापही आहेच. त्यामुळे साहाय्य घेण्याच्या संदर्भातही आता पाक कोंडीत पकडल्यासारखा झाला आहे. जागतिक बँकेच्या तज्ञांचे तर असे म्हणणे आहे की, जरी पाकला १-२ अरब ‘डॉलर’ दिले, तरी केवळ ‘जखमेवर मलमपट्टी’ केल्याप्रमाणे होईल.
भारताने कर्तव्यकठोर भूमिका घ्यावी !
पाकमुळे भारताची झालेली अनन्वित हानी ही कधीही भरून न निघणारी आहे. काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये झालेला आणि आजही अनेकविध माध्यमांतून होत असलेला हिंदूंचा वंशविच्छेद याला पाकपुरस्कृत आतंकवाद कारणीभूत आहे. भारतात मागील २ दशके होत असलेले बाँबस्फोट, गेली अनेक वर्षे होत असलेल्या दंगली, सर्व प्रकारचे जिहाद, पाकने लादलेली ३ युद्धे, आतंकवादी संघटनांचे पोषण, त्यांच्याकडून होणार्या हिंदूंच्या हत्या या सर्वांना सर्वस्वी पाक उत्तरदायी आहे. एवढे असूनही भारताने आतापर्यंत पाकशी जुळवून घेण्यासाठी चर्चारूपी शांतीची कबुतरे उडवत ठेवली, ट्रेन चालू केली, व्यापार चालू ठेवला, कला आणि क्रीडा संबंध ठेवले. एवढेच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही साहाय्य केले आहे. एवढे होऊनही पाकने त्याचा भारतद्वेष यत्किंचितही न्यून केलेला नाही, तर तो वाढवतच आहे. आता ‘त्याच्या याच पापकर्माची फळे तो भोगत आहे’, असे भारतियांना वाटले, तर ते चूक नव्हे. आताही कदाचित् ‘पाकव्याप्त काश्मीर परत घेणे’, ‘पाकमध्ये लपलेले आणि हवे असलेले आतंकवादी भारताला देणे’, ‘अणूबाँब नष्ट करणे’, ‘तेथील हिंदू आणि मंदिरे यांचे रक्षण करणे’, आदी अटी घालून भारत त्याला साहाय्य करूही शकतो; मात्र ‘धूर्त आणि खोटारडा पाक त्या लायकीचा अजिबातच नाही’, हे त्याने आतापर्यंत अनेकदा सिद्ध केले आहे. तो खाल्ल्या मिठाला जागणारा नाही, तर पक्का कावेबाज आणि शत्रुत्व सतत जागृत ठेवणारा आहे. सीमेवर प्रतिवर्षी होणार्या युद्धशांतीच्या कराराच्या संदर्भात गेली अनेक वर्षे भारताने हे अनुभवले आहे. भारताचे साहाय्य घेऊन परत त्याच्यावरच उलटायला तो सिद्धच राहील, यात जराही शंका नाही. म्हणून आताही भारताने अतिशय कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. भारत शासन सध्यातरी पाकच्या दारिद्र्याच्या संदर्भात गेल्या काही मासांपासून कोणत्याही प्रकारचे साहाय्य करण्याच्या मानसिकतेत नाही, हे चांगलेच आहे. पुढे पाकचे नागरिक भारताकडे आश्रय मागतील. शरणार्थींना सहानुभूती दाखवणारी, परकीय निधीवर पोसली गेलेली तथाकथित मानवतावादी जमात त्यांना साहाय्य करण्यासाठी सरकारवर भावनिक दबाव निर्माण करील, ही शक्यताही आता अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. अशा प्रसंगी भारताची अत्यंत कठोर, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रवादी भूमिकाच त्याला संभाव्य पाक शरणार्थ्यांच्या संकटापासून वाचवू शकते. पाकची स्थिती अंधःकारमय असली, तरी भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या कारवायांचे भयावह परिणाम भारत भोगत आहे. भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !
पाक दिवाळखोर झाला असतांना भारताने त्याला सहानुभूती न दाखवता राष्ट्रहित जपणे महत्त्वाचे ! |