पुणे, २३ जानेवारी (वार्ता.) – आतापर्यंत जो इतिहास आपण शिकलो, वाचलो, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच केली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ नये, असे प्रतिपादन सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. पुणे येथील ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ झाल्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.
आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हाही भाग होता. आम्ही कुणाच्या विरोधात नाही; मात्र आमच्या धर्माचे रक्षण आम्ही करत आहोत. हिंदु धर्म रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. सध्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून चालू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. आपण हे सहन करत राहिलो, तर आपल्याला तोंड दाखवायला जागा रहाणार नाही.’’