नागपूर – शहरातील ग्रेटनाग रस्त्यावरील रामबाग वस्तीमध्ये गावगुंडांकडून महिलांचा वारंवार छळ केला जात आहे. या छळाला कंटाळलेल्या महिला रणरागिणींनी ‘गावगुंडांचा कायमचा नायनाट करू’, अशी चेतावणी थेट पोलिसांना दिली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या अवघ्या २०० मीटर अंतरावर या गावगुंडांची दहशत चालू आहे. (‘पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ घडणारे गुन्हे न दिसणारे पालीस आंधळे आहेत का ? कि त्यांना गावगुंडांकडून ‘हप्ते’ मिळत असल्यामुळे ते त्यांच्या कुकृत्यांकडे दुर्लक्ष करतात ?’, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पोलीस ठाण्याच्या आवारातील गुन्हेही रोखू न शकणारे पोलीस संपूर्ण शहरात घडणारे गुन्हे कधी रोखू शकतील का ? अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? – संपादक)
१. रामबाग वस्तीमध्ये मुली आणि महिला यांची छेड काढणे, कुणाच्याही हातातून पैसे लुटणे, हातात चाकू घेऊन रात्री ७ वाजताच सर्वांना घराच्या आत रहाण्यास बळजोरी करणे, अघोषित संचारबंदी लादणे, घराबाहेरील दुचाकी फोडणे, परिसरातील दुकानांतून हप्ते वसूल करणे, वस्तीत लहान मुलांना नशेखोरीला लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे, ही कृत्ये येथे नित्याचीच झाली आहेत. (यावरून येथे पोलीस नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ?, असा प्रश्न पडतो. हे पोलिसांना लज्जास्पद ! हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यासह महिलांनीही स्वसंरक्षण शिकले पाहिजे ! – संपादक)
२. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही गुंड ऋषिकेश वानखेडे आणि त्याची टोळी यांच्या विरोधात अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र थातूरमातूर कारवाई होऊन हे गावगुंड पुन्हा सुटून येतात आणि तक्रार करणार्यांचा सूड उगवतात. (पोलीस अशांना आजन्म कारागृहात का टाकत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|