पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय

बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री (डावीकडे) भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय (उजवीकडे)

बुरहानपुर (मध्यप्रदेश) – मी बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची मुलाखत पाहिली. त्यांनी ते कोणताही चमत्कार करत नसल्याचे सांगितले आहे. ‘माझे माझ्या इष्ट देवतेवर विश्‍वास असून देवतेचे नाव घेऊन मी लोकांची समस्या सोडवतो’, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या समस्यांची सोडवणूक केवळ शास्त्रीच करतात असे नाही, तर हुसेन टेकरी हेही करतात. त्यांच्याकडे जाण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांच्याविषयी अद्याप कुणीच प्रश्‍न का उपस्थित केला नाही ? धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान शाम मानव यांनी त्यांना दिले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.