(म्‍हणे) ‘भगवा हा हिंदुत्‍वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्‍य अभिनेते चेतन कुमार

चेतन कुमार

बंगळुरू – ‘पठाण’ चित्रपटात अभिनेत्रीने भगवे अंतर्वस्‍त्र घातल्‍यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर दाक्षिणात्‍य अभिनेते चेतन कुमार म्‍हणाले, ‘‘भगवा रंग हा हिंदुत्‍वाचा रंग असू शकत नाही. भगवा रंग हा त्‍यागाचे प्रतीक आहे. बसवण्‍णा किंवा भगवान बुद्ध इत्‍यादी अनेकांनी भगव्‍या रंगाचे वस्‍त्र वापरले आहे. अशा रंगाला एका सिद्धांताशी जोडणे योग्‍य नाही. आपल्‍या देशाच्‍या तिरंग्‍यातही भगवा रंग आहे. लहानसहान गोष्‍टीत चुका शोधणे ही यांची (हिंदुत्‍वनिष्‍ठांची) पद्धत झाली आहे. (जेव्‍हा एका विशिष्‍ट धर्माचे लोक क्षुल्लक कारणावरून ‘आमच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या’, असे सांगतात, त्‍या वेळी त्‍यांना असा फुकाचा सल्ला देण्‍याचे धारिष्‍ट्य चेतन कुमार करतात का ? – संपादक)

हे अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा आणण्‍याचे षड्‍यंत्र आहे. याचे राजकारण करणे, हे विरोध करणार्‍यांच्‍या विचारांचा तोकडेपणा दर्शविते.’’

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म हा त्‍याग आणि समर्पण शिकवतो आणि भगवा रंग त्‍याचे प्रतीक आहे. त्‍यामुळे भगवा आणि हिंदु धर्म हे समीकरण आहे. त्‍याविषयी बुद्धीभेद करणारी विधाने करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍याचा हा अश्‍लाघ्‍य प्रकार आहे !