साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टर ठिकठिकाणी अध्‍यात्‍मप्रसारासाठी जात. त्‍या वेळी श्री. प्रकाश शिंदे यांना त्‍यांच्‍या समवेत जाण्‍याची संधी लाभली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगातील आठवणी आणि मिळालेली शिकवण यांविषयीची त्‍यांनी दिलेली सूत्रे येथे दिली आहेत. २० जानेवारी २०२३ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधकत्‍व आणि साधना या दृष्‍टीने दिलेले दृष्‍टीकोन पाहिले. आज या लेखमालेतील अंतिम भाग पाहूया.                             

(भाग ४)

भाग ३ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/646841.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आपत्‍काळाच्‍या दृष्‍टीने साधकांच्‍या मनाची सिद्धता करवून घेणे

श्री. प्रकाश शिंदे

५ अ. बहिणीला स्‍वप्‍नात लढाऊ विमानांतून बाँबवर्षाव होत असून परात्‍पर गुरु डॉक्‍टर ‘पुढे असे महायुद्ध होणार आहे, सगळीकडे बाँब पडतील अन् लक्षावधी माणसे मरतील !’, असे सांगत असल्‍याचे दिसणे : वर्ष १९९८ मध्‍ये माझी बहीण सौ. निर्मला वाळुंज हिला एक स्‍वप्‍न पडले. तिला स्‍वप्‍नात दिसले, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर तिच्‍या खोलीच्‍या बाहेर पलंगावर बसले होते. त्‍या वेळी आकाशातून लढाऊ विमाने घिरट्या घालत होती आणि त्‍या विमानांतून बाँबवर्षाव होत होता. परात्‍पर गुरु डॉक्‍टर तिला सांगत होते, ‘पुढे असे महायुद्ध होणार आहे. सगळीकडे बाँब पडतील आणि लक्षावधी माणसे मरतील !’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तेव्‍हापासूनच पुढे येणार्‍या आपत्‍काळाच्‍या संदर्भात साधकांच्‍या मनाची सिद्धता करवून घ्‍यायला आणि साधना करण्‍याचे महत्त्व सांगायला आरंभ केला.

६. श्री. बबन वाळुंज यांच्‍या (बहिणीच्‍या यजमानांना) झालेल्‍या अपघाताच्‍या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

६ अ. बहिणीचे यजमान अपघातात गंभीररित्‍या घायाळ होऊन रुग्‍णालयात अतीदक्षता विभागात असतांना त्‍यांच्‍यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी महामृत्‍युंजय जप करायला सांगणे : माझ्‍या बहिणीचे यजमान श्री. बबन वाळुंज सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करतात. वर्ष २००१ मध्‍ये एकदा ते नाशिकहून मुंबई येथे दुचाकी गाडीवरून जात असतांना भिवंडी येथे महामार्गावर त्‍यांचा अपघात झाला. अपघातामुळे त्‍यांची स्‍थिती गंभीर होती. त्‍यांच्‍या संपूर्ण जबड्याला दुखापत होऊन दात खिळखिळे झाले होते. त्‍यांना शीव येथील लोकमान्‍य टिळक रुग्‍णालयात अतीदक्षता विभागात ठेवले होते. त्‍यांचे सर्व नातेवाईक काळजी करत होते. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर गोवा येथे रहात होते. मी त्‍यांना बहिणीच्‍या यजमानांच्‍या गंभीर स्‍थितीविषयी कळवल्‍यावर त्‍यांनी मला श्री. वाळुंज यांच्‍यासाठी महामृत्‍युंजय जप करायला सांगितला.

श्री. बबन वाळुंज

६ आ. श्री. वाळुंज यांचे शस्‍त्रकर्म पुढे जात असल्‍याने साधकाला ताण येणे आणि त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘आपण इतरांसारखे उतावीळ न होता ‘ईश्‍वर योग्‍य वेळी शस्‍त्रकर्म करणार आहे’, अशी विचारसरणी ठेवायला हवी’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांनी वाळुंज यांचे शस्‍त्रकर्म करायचे ठरवले; पण काही कारणांनी ते पुढे ढकलले जायचे. त्‍या काळात वाळुंज यांना काही खाता-पिता येत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांचे नातेवाईक ‘त्‍यांना खासगी रुग्‍णालयात भरती करा’, असे सांगत होते. त्‍यामुळे बहिणीला आणि मला ताण आला. याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना समजल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘शस्‍त्रकर्म पुढे जात असेल, तर जाऊ दे. ‘ते कधी करायचे ?’, ते ईश्‍वर ठरवील. आपण साधक आहोत. आपली विचारसरणी अशी पाहिजे, ‘ईश्‍वर योग्‍य वेळी शस्‍त्रकर्म करणारच आहे’, आपण इतरांसारखे उतावीळ होता कामा नये.’’ त्‍यांचे बोलणे ऐकून माझा ताण नाहीसा झाला.

६ इ. श्री. वाळुंज ३-४ दिवसांनी गंभीर स्‍थितीतून बाहेर आल्‍यावर त्‍यांनी ‘तिन्‍ही दिवस परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍या जवळ असल्‍याने मी आनंदात होतो’, असे सांगणे आणि त्‍या वेळी ‘ते केवळ गुरुदेवांच्‍या कृपेने वाचले’, असे लक्षात येणे : त्‍यानंतर ३-४ दिवसांनी श्री. वाळुंज गंभीर स्‍थितीतून बाहेर आले. ते बरे झाल्‍यानंतर मी त्‍यांना सांगितले, ‘‘अपघात झाल्‍यानंतर तुम्‍ही ३ दिवस बेशुद्ध होता. त्‍यामुळे आम्‍ही सगळे चिंतेत होतो.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले ‘‘अपघात झाल्‍यापासून मी बेशुद्धावस्‍थेत असेपर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टर तिन्‍ही दिवस माझ्‍या जवळच होते. त्‍यामुळे मी आनंदावस्‍थेत होतो आणि मला वेदनांची जाणीवच होत नव्‍हती.’’ तेव्‍हा ‘एवढा भीषण अपघात होऊनही केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने ते वाचले’, असे माझ्‍या लक्षात आले.

६ ई. श्री. वाळुंज यांच्‍या कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘कुटुंबियांचे प्रारब्‍ध खडतर असल्‍याचे सांगून श्री. वाळुंज यांनी साधना केल्‍यामुळे त्‍यांचे प्राण वाचले’, असे सांगणे : मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितले, ‘‘श्री. वाळुंज यांचे प्रारब्‍ध तीव्र आहे. त्‍यांच्‍या घरात पूर्वजांचा त्रास आहे. त्‍यांच्‍या लहान भावाचा भाजल्‍यामुळे मृत्‍यू झाला. त्‍यांची आई ज्‍या खोलीत रहात होती, तेथे चोर आले आणि त्‍यांच्‍याशी झालेल्‍या झटापटीत तिच्‍या मेंदूला मार लागून काही दिवसांनी तिचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या बहिणीने गळफास लावून आत्‍महत्‍या केली आहे.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘किती खडतर प्रारब्‍ध आहे ! असे क्‍वचितच पहायला मिळते. श्री. वाळुंज यांचेही असेच झाले असते; परंतु त्‍यांनी साधना केल्‍यामुळे त्‍यांचे प्राण वाचले.’’ खरेतर गुरुदेवांनीच श्री. वाळुंज यांच्‍यावरील संकटाचे निवारण केले होते. ‘हे गुरुदेवा, तुम्‍हीच आम्‍हाला या आधिभौतिक आणि आधिदैविक संकटांतून वाचवता अन् स्‍वतः मात्र नामानिराळे रहाता !’’

७. वडिलांच्‍या (प.पू. बाळाजी वासुदेव आठवले (प.पू. दादा) यांच्‍या) देहत्‍यागाच्‍या समयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

७ अ. दुःखद प्रसंगात स्‍थिर रहाणारे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे कुटुंबीय ! : एखाद्याच्‍या घरात कुणाचा मृत्‍यू झाला, तर त्‍या कुटुंबातील सर्व जण वेगळ्‍या मनःस्‍थितीत असतात. त्‍या घरात रडारड चालू असते. तेथे मन विषण्‍ण करणारे दुःखद वातावरण असते. जानेवारी १९९५ मध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे वडील प.पू. बाळाजी वासुदेव आठवले (प.पू. दादा) यांनी देहत्‍याग केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे सर्व बंधू, तसेच अन्‍य नातेवाईक शांत होते. घरात प.पू. बाबांची (प.पू. भक्‍तराज महाराज यांची) भजने लावली होती. सर्व जण त्‍यांना सांगितलेली कामे करत होते. यातून कुटुंबातील सर्वांची परिपक्‍वता लक्षात येऊन ‘दुःखद प्रसंगाला सामोरे कसे जायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.

७ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना आपत्‍काळाच्‍या दृष्‍टीने ‘तिरडी कशी बांधायची ?’, हे शिकून घ्‍यायला सांगणे : प.पू. दादांच्‍या अंत्‍ययात्रेसाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे मेहुणे (डॉ. (सौ.) कुंदाताईंचे भाऊ श्री. जयंत बोरकर) तिरडी बांधत होते. ‘तिरडी कशी बांधायची ?’ हे त्‍यांना ठाऊक होते. ते तिरडी बांधत असतांना आम्‍ही काही साधक तेथे नुसतेच उभे होतो. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर तेथे आले आणि आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘नुसते उभे काय राहिलात ? ‘तिरडी कशी बांधायची ?’, ते बोरकरमामांकडून शिकून घ्‍या. पुढे उपयोगी पडेल. तिरडी बांधण्‍यासारख्‍या गोष्‍टी सगळ्‍यांनाच येत नाहीत.’’ ‘भीषण आपत्‍काळात या गोष्‍टीही साधकांना करता यायला हव्‍यात’, यासाठी त्‍यांनी ‘तिरडी बांधणे’ शिकून घ्‍यायला सांगितले’, असे मला त्‍या वेळी वाटले.

७ इ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकाला अंत्‍ययात्रेसाठी न थांबता सेवेला प्राधान्‍य द्यायला सांगणे आणि त्‍या वेळी ‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी भावनेत न अडकता दिलेली सेवा पूर्ण करायला हवी’, ही शिकवण मिळणे : प.पू. दादांनी देहत्‍याग केला, त्‍या वेळी काही सेवेनिमित्त मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरीच होतो. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या इंदूर येथे होणार्‍या ‘अमृत महोत्‍सवा’च्‍या कार्यक्रमासाठी जाणार्‍या काही साधकांची रेल्‍वेची तिकीटे काढण्‍याची सेवा दिली होती. मी त्‍या सेवेसाठी न जाता प.पू. दादांच्‍या अंत्‍ययात्रेला जाण्‍यासाठी थांबलो होतो. हे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना समजल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘तुझी इथे काहीच आवश्‍यकता नाही. तू तिकिटे काढण्‍यासाठी जा.’’ अशा दु:खद प्रसंगीही ते साधकाच्‍या सेवेच्‍या नियोजनाकडे लक्ष देत होते. ‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी भावनेत न अडकता दिलेली सेवा पूर्ण करायला हवी’, हे मला त्‍या वेळी शिकायला मिळाले.

– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), डोंबिवली, जिल्‍हा ठाणे, महाराष्‍ट्र. (६.९.२०२०)

(समाप्‍त)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक