विटनेर (जिल्‍हा जळगाव) येथील मजारवर फडकवला पाकिस्‍तानी ध्‍वज !

प्रत्‍यक्षात तो पाकिस्‍तानी ध्‍वज नसल्‍याचे स्‍पष्‍ट

जळगाव, १९ जानेवारी (वार्ता.) – तालुक्‍यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्‍थळावर (मजारवर) पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवण्‍यात आला. १८ जानेवारीला सकाळी हा प्रकार समोर आला. यामुळे हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त झाले आहेत. मोठ्या संख्‍येने कार्यकर्त्‍यांसह पदाधिकार्‍यांनी विटनेर गावात झालेला प्रकार जाणून घेतला. एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सहकारी यांनी प्रार्थनास्‍थळावर फडकवण्‍यात आलेला ध्‍वज तातडीने कह्यात घेतला. या प्रकरणी तक्रार देण्‍यात आली असली, तरी गुन्‍हा नोंद झालेला नाही.

प्‍लंबर (नळाचे काम करणारा) गोपाळ सुपडू कहार याने हा ध्‍वज लावल्‍याचे समोर आले. त्‍याला कह्यात घेतल्‍यानंतर त्‍याने सांगितले, ‘‘प्रार्थनास्‍थळावर (मजार) ध्‍वज नसल्‍याने तो लावण्‍याची आज्ञा स्‍वप्‍नात झाल्‍याने मी असे केले. पाकिस्‍तानचा ध्‍वज असा आहे, हे मला ठाऊक नव्‍हते.’’ यानंतर पोलिसांनी चौकशी करून त्‍याला सोडून दिले. पाकिस्‍तानचा ध्‍वज पूर्णतः हिरवा आहे; पण येथे सापडलेल्‍या ध्‍वजाला शेवटी पांढरी किनार आहे.

विटनेर येथे लावलेला ध्‍वज पाकिस्‍तानी नसल्‍याची पूर्णपणे निश्‍चिती केली आहे. नेरी येथील व्‍यक्‍तीने श्रद्धेतून हा ध्‍वज लावला; मात्र घडलेल्‍या प्रकारानंतर पोलिसांनी ध्‍वज कह्यात घेतला आहे. अनवधानातून घडलेल्‍या या प्रकाराविषयी गुन्‍हा नोंद करण्‍यात आलेला नाही, असे निरीक्षक हिरे म्‍हणाले.

षड्‌यंत्र असल्‍याचा संशय ! – हेमंत गुरव, कार्यकर्ता, बजरंग दल

विटनेर येथील दर्गा काही धर्मांधांचा अड्डा असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात असून सर्वत्र धर्मांतराचे प्रकारही घडत असल्‍याचे सांगितले जाते. तक्रारीनंतर ही मजार सील करण्‍यात आली असून या प्रकरणी बजरंग दल कार्यकर्ता हेमंत गुरव यांनी तक्रार प्रविष्‍ट केली आहे. यामागे काही षड्‌यंत्र आहे का ? याचे अन्‍वेषण करणे आवश्‍यक आहे.