प्रामाणिक राजकारणी आर्डन !

न्‍यूझीलंडच्‍या पंतप्रधान जेसिंडा आर्डन

न्‍यूझीलंडच्‍या पंतप्रधान जेसिंडा आर्डन पुढील मासात त्‍यांच्‍या पदाचे त्‍यागपत्र देणार आहेत. गेली ६ वर्षे त्‍या देशाच्‍या पंतप्रधानपदी आरूढ आहेत. अवघ्‍या ३७ व्‍या वर्षी त्‍या पंतप्रधान झाल्‍या आणि आता ४३ व्‍या वर्षी पदाचे त्‍यागपत्र द्यायला सिद्ध झाल्‍या आहेत. येत्‍या काळात न्‍यूझीलंडमध्‍ये निवडणूक होईल. ही निवडणूक त्‍या लढवणार नाहीत, हेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. ‘या निवडणुकीत आर्डन यांच्‍या पक्षाचा पराभव होईल. त्‍यामुळे त्‍यांनी त्‍यागपत्र देणे इष्‍ट समजले’, असाही कयास लावला जात आहे. त्‍यांनी त्‍यागपत्र देण्‍याची कारणे काहीही असोत, भारतियांसाठी मात्र त्‍यांचा हा निर्णय नक्‍कीच अचंबित करणारा आहे. वयाच्‍या केवळ ३७ व्‍या म्‍हणजेच राजकारणाच्‍या दृष्‍टीने अगदी अल्‍पवयात पंतप्रधानपदी आरूढ होऊन आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर स्‍वतःचा ठसा उमटवणे आणि तितक्‍याच सहजपणे या पदावरून पायउतार होणे, ही जागतिक स्‍तरावर नोंद घेण्‍यासारखी घटना होय. भारतात असे घडू शकते का ? नाही म्‍हणायला दिवंगत राजीव गांधी हे वयाच्‍या ४० व्‍या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले होते; मात्र हे पद त्‍यांनी कर्तृत्‍व गाजवून मिळवले नव्‍हते, तर ती तत्‍कालीन काँग्रेस सरकारची राजकीय अपरिहार्यता होती. असो. भारतात एखाद्या राजकारण्‍याला ‘लोकनेता’ म्‍हणून उदय व्‍हायलाच वयाची पस्‍तीशी किंवा चाळीशी गाठावी लागते. त्‍यानंतर एक-एक शिडी पार करत साधारण वयाच्‍या ४० व्‍या वर्षानंतर एखादा नेता मंत्रीपदापर्यंत मजल मारू शकतो. यात त्‍याचे कर्तृत्‍व किती ? आणि त्‍याला पक्षातून मिळालेल्‍या पाठिंब्‍याचा भाग किती ? हा चर्चेचा विषय असू शकतो. वर्ष २०१९ च्‍या एका अहवालानुसार लोकसभेत निवडून आलेल्‍या केवळ ७१ खासदारांचे वय हे ४० पेक्षा अल्‍प, तर तसेच २.२ टक्‍के खासदारांचे वय हे ३० पेक्षा अल्‍प आहे. प्रत्‍येक ४ पैकी १ खासदाराचे वय हे ४५ पेक्षा अल्‍प आहे. न्‍यूझीलंड हा आकाराच्‍या मानाने भारतापेक्षा अगदीच छोटा देश आहे; मात्र आर्डन यांनी ज्‍या कारणांमुळे पदाचे त्‍यागपत्र देण्‍याचे निश्‍चित केले, ती कारणे आणि त्‍यामागील विचारप्रक्रिया निश्‍चित अभ्‍यास करण्‍यासारखी आहे. त्‍यामुळे आर्डन यांच्‍या राजकीय कारकीर्दीची या दृष्‍टीकोनातून चर्चा व्‍हायलाच हवी.

प्रामाणिकपणा महत्त्वाचा !

आर्डन यांनी त्‍यागपत्र देण्‍याची घोषणा करतांना देशाचे नेतृत्‍व करण्‍याएवढी स्‍वतःमध्‍ये शक्‍ती नसल्‍याचे स्‍पष्‍टपणे सांगितले. ‘राजकारणी आणि प्रामाणिकपणा’, हे तसे दुर्मिळ समीकरण. भारतात तर ते अभावानेच बघायला मिळते. ‘एखाद्या मंत्रालयाचे दायित्‍व पार पाडायला मी सक्षम नाही’, असे सांगत त्‍यागपत्र देण्‍याच्‍या घटना भारतात फार दुर्मिळ आहेत. त्‍यामुळे राजकारणाच्‍या दलदलीत आर्डन यांची कृती उठून दिसते. आर्डन या काही मवाळ पंतप्रधान नाहीत. त्‍यांनी त्‍यांच्‍या कार्यकाळात कोरोना महामारीसह अनेक आपत्तींना समर्थपणे तोंड दिले. या आपत्तींना सामोरे जाण्‍यासाठी त्‍यांनी त्‍यांचा विवाहही पुढे ढकलला होता. एकंदरीत त्‍यांच्‍या कार्याचा आवाका पहाता ‘एक कर्तृत्‍ववान महिला पंतप्रधान’ म्‍हणून त्‍यांना ओळखले जाते. राजकारणात सत्ता ही येत-जात असते. त्‍यामुळे समजा आर्डन यांचा पक्ष पराभूत झाला, तर काही काळ संसदेत विरोधी बाकावर बसून त्‍या पुन्‍हा देशाचे उच्‍चपद भूषवू शकतात; मात्र आर्डन यांना राजकारणातील नियमितच्‍या मार्गाने चालायचे नाही. त्‍यांना मुलीच्‍या संगोपनात वेळ व्‍यतित करायचा आहे. तारुण्‍यात पदाचा वापर करून हिरिरीने देशसेवा केली आणि कालांतराने त्‍याला पूर्णविराम देऊन वेगळा मार्ग धुंडाळायचा निर्णय आर्डन यांनी घेतला आहे. न्‍यूझीलंडच्‍या राजकारणामध्‍ये याचा प्रत्‍यय पूर्वीही आला होता. काही वर्षांपूर्वी न्‍यूझीलंडचे माजी पंतप्रधान जॉन की यांनी कौटुंबिक कारणांमुळे पंतप्रधानपद सोडत असल्‍याचे प्रांजळपणे सांगून पदाचे त्‍यागपत्र दिले होते. वर्ष २००८ ते २०१६ या काळात त्‍यांनी पंतप्रधानपद भूषवले. एवढी वर्षे देशाच्‍या सर्वोच्‍च पदावर राहून केवळ मुले आणि पत्नी यांना वेळ मिळत नाही; म्‍हणून कोणतेही आढेवेढे न घेता अगदी अलगदरित्‍या त्‍यांनी पद सोडले. ‘आता देशसेवेला प्राधान्‍य कि कौटुंबिक कारणांना ?’, हा चर्चेचा विषय असू शकतो; मात्र दोन्‍ही दगडांवर पाय ठेवणे झेपत नसल्‍याचे प्रांजळपणे सांगून पदमुक्‍त होण्‍याची कृती किती जण करतात ?

राजकारणामधील माणूस !

‘राजकारणीही माणूस असतो’, हेही आर्डन स्‍पष्‍टपणे सांगतात. राजकारणात शह-काटशह, छक्‍के-पंजे लढवावे लागतात. ‘इतरांपेक्षा मी सर्वच अंगांनी श्रेष्‍ठ आहे’, अशी प्रतिमा निर्माण करावी लागते. ‘समाजकारणासाठी राजकारण’, ही संकल्‍पना भारतात तर कधीच मागे पडली आहे. स्‍वार्थ, पद किंवा अधिकार गाजवणे यांसाठी सत्ता, हेच समीकरण बर्‍याच राजकारण्‍यांच्‍या संदर्भात दिसून येते. त्‍यामुळे सत्ता हस्‍तगत करून ती अधिकाधिक काळ उपभोगणे, हा राजकारणातील अविभाज्‍य भाग बनला आहे. यात आर्डन यांच्‍यासारख्‍ये राजकारणातील माणूसपण लोकांना अधिक भावते. पंतप्रधान म्‍हणून पार पाडाव्‍या लागणार्‍या दायित्‍वाची त्‍यांना पुरेपूर जाण आहे. हे दायित्‍व पार पाडतांना येणार्‍या अडचणी किंवा होणार्‍या चुका यांचीही त्‍यांना जाणीव आहे. ‘त्‍यामुळे माणूस म्‍हणून हे दायित्‍व पार पडतांना आपण अल्‍प पडलो’, हे त्‍या अनाहूतपणे सुचवतात.

असे माणूसपण जपणारी मंडळी राजकारणात सक्रीय असल्‍यास ती देशाचा कार्यभार संवेदनशीलपणेच हाकणार, हे वेगळे सांगायला नको. त्‍यामुळे भारतात आर्डन यांच्‍यासारख्‍या राजकारण्‍यांची नितांत आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी अशा हरहुन्‍नरी तरुणांना हेरून त्‍यांना राजकारणात संधी देण्‍याचा उदात्तपणा भारतातील राजकीय पक्ष दाखवतील का ? याचे कारण असे की, भारतात राजकारणातून संन्‍यास असे काही नसतेच. सत्तरी, पंचाहत्तरी, हेच कशाला, ८० वर्षे गाठलेले राजकारणी अजूनही राजकारणात सक्रीय आहेत. ‘अशांचे समाजाला योगदान किती ?’, हे पडताळण्‍याची वेळ आता आली आहे. आर्डन यांनी ‘खरा नेता तो, ज्‍याला पद सोडण्‍याची वेळ ठाऊक असते’, असे म्‍हटले होते. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍याचे चिंतन भारतीय राजकारण्‍यांनी करणे आवश्‍यक आहे.

माणूसपण जपणारी मंडळी राजकारणात सक्रीय झाली, तर ती देशाचा कारभार संवेदनशीलपणेच चालवतील !