|
फर्मागुडी (फोंडा) – महाविद्यालयातील उपाहारगृहात केवळ शिजवलेले पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ ठेवावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानीकारक अन् अपायकारक शीतपेये आणि ‘चिप्स’ उपाहारगृहात विक्रीसाठी ठेवू नयेत. शीतपेयांऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, दूध आदी पेये विक्रीस ठेवण्यात यावीत, असा निर्णय फर्मागुडी येथील रवि नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत घेण्यात आला. १३ जानेवारीला महाविद्यालयात ही बैठक झाली.
बैठकीतील कांही सूत्रे –
१. उपाहारगृहात चिप्स आणि शीतपेय यांच्या विक्रीस पूर्णपणे बंदी घालावी, तसेच प्रत्येक आठवड्याची खाद्यपदार्थांची सूची उपाहारगृहात लावण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांची असे पौष्टिक पदार्थ खाण्याची रूची वाढू शकते.
२. प्रत्येक १५ दिवसांनी उपाहारगृहातील खाद्यपदार्थांची नमुना चाचणी पालक-शिक्षक संघाच्या वतीने करण्यात येईल. या संदर्भातील माहिती उपाहारगृह समितीला देण्यात यावी, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.
३. विद्यार्थ्यांना डब्यातून सकस आणि पौष्टिक आहार देण्यात यावा, यासाठी त्यांच्या मातांमध्येही जागृती करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकांसाठी शिबिरे आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्याविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली.
४. वर्गात शिक्षक शिकवत असतांना विद्यार्थ्यांना भ्रमणभाष वापरण्यास बंदी घालावी, असेही सूत्र उपस्थित करण्यात आले.
५. पालक-शिक्षक संघातील १० सदस्यांनी प्रत्येकी १०० पालकांशी संपर्क करून त्यांचे प्रबोधन करण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले.
संपादकीय भूमिकाअसा स्तुत्य निर्णय सर्वच शाळा-महाविद्यालयांत घेण्यात यावा ! |