पुणे येथील १३ अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर गुन्हे नोंद !

पुणे – मान्यता नसतांनाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू केल्यामुळे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश असून २ दिवसांत या शाळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या शाळा अनधिकृत असल्याने त्यांची माहिती जिल्हा परिषदेला दिली जात नसल्याचे उघड झाले आहे.

यापूर्वी गटशिक्षणाधिकार्‍यांनी नोटीस देऊन पडताळणी केली होती. त्या वेळी गेल्या वर्षी जिल्ह्यातील ४३ शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेने कारवाई केली होती. त्यापैकी २९ बंद असलेल्या शाळा होत्या, तर १४ शाळा चालू होत्या. त्यापैकी ४ शाळांनी प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली.