गोवा : हणजूण येथे ध्वनीप्रदूषणाविषयी एका उपाहारगृहावर कारवाई

म्हापसा, १४ जानेवारी (वार्ता.) – हणजूण येथे मोठ्या आवाजात संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याविषयी ‘एक्सओएक्सओ’ या उपाहारगृहाचे मालक दिपांश बजाज आणि व्यवस्थापक सुरेश रामोला यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे. दिपांश बजाज हे मूळ सहरानपूर, उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून सुरेश रामोला हे मूळ उत्तरकाशी, उत्तराखंडमधील रहिवासी आहेत.

यासंबंधी उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारीच्या रात्री दिपांश बजाज आणि सुरेश रामोला त्यांच्या उपाहारगृहामध्ये अनुज्ञप्ती न घेता मोठ्या आवाजात संगीत वाजवत होते. त्या वेळी पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी या उपाहारगृहावर धाड घातली. या उपाहारगृहाच्या मालकांनी ध्वनीप्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ यांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी उपाहारगृहातील ध्वनीक्षेपक जप्त केले आहेत. यासंबंधी पुढील अन्वेषण चालू आहे.